नाट्यदिग्दर्शक वाय. जी. भोसले यांचे निधन

By Admin | Updated: July 5, 2016 00:27 IST2016-07-04T22:54:03+5:302016-07-05T00:27:09+5:30

नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या सूचनेवरून जाणीवपूर्वक चित्रपटाची मोहमयी दुनिया सोडून रंगभूमीकडे वळत तिची अखंड प्रदीर्घ सेवा करत राहिले.

Theater director G. Bhosale's death | नाट्यदिग्दर्शक वाय. जी. भोसले यांचे निधन

नाट्यदिग्दर्शक वाय. जी. भोसले यांचे निधन

कोल्हापूर : मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीला अभिनयसंपन्न दर्जेदार कलाकार मिळवून देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक व हॉटेल चोपदारचे मालक यशवंतराव गणपतराव तथा वाय. जी. भोसले यांचे सोमवारी सकाळी वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील सर्जनशील कलावंत तसेच ध्येयवेडा दिग्दर्शक हरपला, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुलगे, मुलगी, जावई, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी होणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, दिग्दर्शक भास्कर जाधव, सतीश रणदिवे, सतीश बिडकर, चंद्रकांत जोशी, यशवंत भालकर, भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह चित्रपट व नाट्यसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.
वाय. जी. भोसले यांचा जन्म दि. १ सप्टेंबर १९२६ सालचा. त्यांचे वडील गणपतराव हे शाहू महाराजांच्या दरबारात चोपदार होते. शाहूंच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी ‘हॉटेल चोपदार’ सुरू केले. त्यांचे शिक्षण बेताचेच होते. गणपत पाटील, दिग्दर्शक माधव भोईटे, जी. बी. अष्टेकर हे त्यांचे शाळेतील मित्र. बालवयातच त्यांना नाटकाची गोडी लागली. मास्टर विनायक व चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कंपनीमध्ये सहायक म्हणून ते रूजू झाले; परंतु नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांच्या सूचनेवरून जाणीवपूर्वक चित्रपटाची मोहमयी दुनिया सोडून रंगभूमीकडे वळत तिची अखंड प्रदीर्घ सेवा करत राहिले. शहरातील मान्यवर संस्था, नाट्यसंस्था, महाविद्यालये, सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, कोल्हापूर पोलिस दलाच्या नाटकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Theater director G. Bhosale's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.