Sanjay Mandlik: कागल तालुक्यात जातीयवादाला रोखण्यासाठी आम्ही तिघे एकत्र - खासदार संजय मंडलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 12:17 PM2022-04-19T12:17:00+5:302022-04-19T12:28:16+5:30

कोण कधी जन्माला आला, यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे आहे, असा समजदारीचा सल्लाही खासदार संजय मंडलिक यांनी यावेळी दिला.

The three of us together to prevent racism, MP Sanjay Mandalik expressed his opinion | Sanjay Mandlik: कागल तालुक्यात जातीयवादाला रोखण्यासाठी आम्ही तिघे एकत्र - खासदार संजय मंडलिक

छाया : संदीप तारळे

googlenewsNext

म्हाकवे : ‘कागल तालुक्यात जातीयवाद वाढू नये, यासाठी मी, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे एकत्रित काम करू,’ असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. कोण कधी जन्माला आला, यापेक्षा कामाचे मूल्यमापन गरजेचे आहे, असा समजदारीचा सल्लाही त्यांनी दिला. कौलगे (ता. कागल) येथील नंदू पाटील यांच्या सत्कार समारंभात खासदार मंडलिक, मंत्री मुश्रीफ व माजी आमदार घाटगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

खासदार मंडलिक म्हणाले, ‘महाविकास आघाडी म्हणून माझ्यासह मंत्री मुश्रीफ व संजयबाबा आम्ही तिघेही एकत्रच काम करीत आहोत; परंतु मधल्या काळात काम करत-करत मुश्रीफ आणि संजयबाबा मला जरा विसरले होते. हिंदुत्वाच्या मुद्द्यासह सीबीआय, इन्कम टॅक्स या माध्यमातून या देशांमध्ये एक प्रकारची अघोषित आणीबाणीच सुरू आहे.’

खासदार मंडलिक म्हणाले, ‘आता रामनवमी म्हटले की मुश्रीफ यांचा वाढदिवस, गुढीपाडवा म्हटले की माझा वाढदिवस असे अनेक वर्षे चालत आले आहे. आता तिथीच्या वादात पडायला नको म्हणून मी तारखेप्रमाणे वाढदिवस करायचा ठरवलं आहे.’

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘महाविकास आघाडी म्हणून मी, खासदार मंडलिक व माजी आमदार घाटगे आम्ही एकत्रच आहोत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेगळे चित्र निर्माण झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे मंडलिक यांना झुकावे लागले व वेगळे पॅनेल केले. त्यातून मतभेद जरी झाले तरी माझ्या नेत्याचा मुलगा आणि छोटा गुरुबंधू असल्यामुळे काहीही झाले तरी आम्ही तिघेही एकत्रच आहोत. यामध्ये आमचा कोणताही स्वार्थ नाही.’

माजी आमदार घाटगे म्हणाले, ‘मंत्री मुश्रीफ हे रामनवमीला जन्मले. मी त्यादिवशी जन्मलो नाही त्याला काय करूया..? मलाही श्रीकृष्ण जयंतीला, शिवजयंती रोजीच जन्माला यायला पाहिजे होते, असे वाटते; परंतु ते सारे निसर्गाच्या हातात असते, एवढे तरी लक्षात घेऊ या.’

मुश्रीफ आमचे दादा

संजय घाटगे म्हणाले, ‘यापूर्वी मंत्री मुश्रीफ हे माझ्यापेक्षा लहान आहेत असे समजायचो; परंतु या सगळ्या वादात एक गोष्ट स्पष्ट झाली की एक महिन्याने का असेना ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे मोठा भाऊ म्हणून त्यांचा आदर अधिकच वृद्धिंगत होईल. ते आमचे दादा आहेत.’

Web Title: The three of us together to prevent racism, MP Sanjay Mandalik expressed his opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.