गडहिंग्लज: जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक आणि गावातील हायस्कूलमध्येच माध्यमिक शिक्षण घेतलेल्या माजी सैनिकाच्या मुलाने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ६०५ वा क्रमांक पटकावला.भारतीय महसूल सेवेतील ( आयआरएस) उच्चपदाला त्यांने गवसणी घातली. पाचशे लोकवस्तीच्या जांभुळवाडी गावातील या जिद्दी तरुणाचे नाव आहे, दिलीपकुमार कृष्णा देसाई.नववीपर्यंत मुंगूरवाडी हायस्कूलमध्ये शिकल्यानंतर त्याने गडहिंग्लज हायस्कूलमधून दहावीची परीक्षा दिली.साधना प्रशालेतून बारावी विज्ञान उत्तीर्ण झाला.त्यानंतर इस्लामपूरच्या 'आरआयटी'मधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनची अभियांत्रिकी पदवी घेतली.परंतु,'आयएएस'च व्हायचं अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली होती.सध्या नागपूर येथे उपजिल्हाधिकारीपदी कार्यरत असणारी बहिण स्वाती हिची प्रेरणा व मार्गदर्शन आणि आई सुनीता,वडिल कृष्णा, मोठ्या भगिनी भारती व सपना यांच्या भक्कम पाठबळावर त्याने 'युपीएससी'च्या परीक्षेची तयारी केली.'सारथी'च्या शिष्यवृत्तीमुळे दिल्लीत राहुन लेखी परीक्षेबरोबरच मुलाखतीचे 'तंत्र'ही अवगत केले.तब्बल आठवेळा यशाने हुलकावणी दिली.मात्र,खचून न जाता नवव्या प्रयत्नात यशश्री खेचून आणली.सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असूनही घरच्यांनी दिलेले प्रोत्साहन, स्वातीताईंचे मार्गदर्शन आणि शिक्षक व मित्रमंडळींच्या सहकार्यामुळेच हे यश मिळाले,असे त्यांने नम्रपणे सांगितले. पोरानं नाव काढलं!स्वाती उपजिल्हाधिकारी झाली,तिच्या पाठोपाठ दिलीपकुमारही मोठा अधिकारी झाला.याचा आम्हांला खूप आनंद झाला.चारवेळा मुलाखतीत थोडक्यात हुकले.पण,त्यानं जिगर सोडली नाही.भरपूर मेहनत घेतली.आमच्या कष्टाचं सार्थक झालं, पोरानं नाव काढलं,अशी भावना त्याच्या वडिलांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
'जांभूळवाडी'च्या माजी सैनिकाच्या मुलाचा 'युपीएससी'त झेंडा..! 'सारथी'चे पाठबळ, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 23:28 IST