कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ३७०० रुपये पहिली उचलची मागणी केली आहे. याबाबत साखर कारखानदार व संघटनांची बैठक पंधरा दिवसांत बोलवावी, अशी मागणी ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांच्याकडे केली आहे.राज्य शासनाने १५ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे हंगाम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. ‘स्वाभिमानी’ने मागील हंगामातील प्रतिटन २०० रुपये कारखानदार देय आहेत, त्यासह यंदाच्या हंगामासाठी प्रतिटन ३७०० रुपये पहिली उचल द्यावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांचे यंदा महापूर व लांबलेल्या गळीत हंगामामुळे नुकसान झाले आहे.सोलापूर जिल्ह्यातील १०.८० साखर उताऱ्यासाठी प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल जाहीर केलेली आहे. १२ ते १२.३० साखर उताऱ्यासाठी तोडणी वाहतूक वजा जाता ३७०० रुपये उचल जाहीर करण्यात कोणतीच अडचण नाही.अन्यथा तीव्र आंदोलनयेत्या १५ दिवसांत जर काही निर्णय झाला नाही तर शासन व साखर कारखानदार यांना तीव्र आंदोलनास सामोरे जावे लागणार असून, या आंदोलनाने झालेल्या नुकसानीस संघटना जबाबदार असणार नसल्याचा इशारा शेट्टी यांनी साखर आयुक्त खेमणार यांना दिला आहे.
पहिल्या उचलबाबत पंधरा दिवसांत बैठक बोलवा, राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:30 IST