कोल्हापूर : जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर वेळेत परीक्षा व वेळेत निकाल लावण्याचे आश्वासन सरकारने अनेकदा परीक्षार्थींना दिले. मात्र, हे आश्वासन नेहमीच हवेत विरत असल्याचा प्रत्यय ‘टीईटी’च्या प्रलंबित निकालावरून आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होऊन अडीच महिने सरले तरी याचा निकाल अद्यापही जाहीर झाला नसल्याने शिक्षक होऊ इच्छिणारे महाराष्ट्रातील लाखो डीएड, बीएडधारक विद्यार्थी घायकुतीला आले आहेत.टीईटी परीक्षा १० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली. ३ लाख २९ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी राज्यभरातून परीक्षा दिली. मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार लक्षात घेता बायोमेट्रिक, फेस रीडर बायोमेट्रिक प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरा, अशा तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. ओएमआर पद्धतीने परीक्षा होऊन अंतिम उत्तर तालिका जाहीर झाली. मात्र, अद्याप निकाल जाहीर झाला नसल्याने राज्यभरातील लाखो डीएड, बीएड उमेदवारांचे लक्ष या निकालाकडे लागून आहे.
सरकारने आधी वेळापत्रक निश्चितीचे धोरण ठरवून निकाल वेळेत लावणे अपेक्षित आहे. गेले तीन महिने राज्यातील लाखो डीएड, बीएड उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. - राम करे, सचिव, ऑल इंडिया युथ फेडरेशन