कोल्हापूर : निवडणूक विभागाकडून सुरू असलेल्या मतदान फेरपडताळणीत विधानसभा निवडणुकीत झालेले मतदान दाखवले, पण त्याच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या दाखवल्या गेल्या नाहीत. विभागाचा कारभार पारदर्शी आहे, लपवण्यासारखे काही नाही तर जे दाखवायला पाहिजे तेच का लपवले गेले, आम्ही एवढे पैसे भरून, प्रशासनाने एवढी मोठी यंत्रणा लावून उपयोग काय, असा प्रश्न विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार नंदाताई बाभूळकर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केला. हा आक्षेप लेखी स्वरूपात निवडणूक आयोगाला कळवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या मागणीनुसार सध्या राजाराम तलाव येथील शासकीय गोदामात चंदगड, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील मशीनची फेरपडताळणी बुधवारपासून सुरू आहे. गुरुवारी उमेदवार नंदाताई बाभूळकर या स्वत: प्रक्रियेवेळी उपस्थित होत्या. नंतर त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या, फेरपडताळणी सुरू करताना यंत्रणेने त्या केंद्रावर कुणाला किती मते पडली याचा आकडा दाखवला. त्यानंतर मशीन रिसेट करून नव्याने मॉकपोल सुरू केले.पण, निवडणुकीवेळी झालेल्या मतदानावर शिक्कामोर्तब करणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या दाखवल्या गेल्या नाहीत. मग आम्ही फक्त दाखवलेल्या आकडेवारीवर विश्वास कसा ठेवायचा. याबाबत विचारणा केली असता प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हे नसल्याचे सांगितले. पण, हे चुकीचे असून, मी निवडणूक आयोगाला लेखी कळवणार आहे.गुरुवारी चंदगड विधानसभा मतदारसंघातील केंद्र क्र. १२५ महागाव व केंद्र क्र. २३८ चंदगड तसेच २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील केंद्र क्र. ०३ शुगल मिल कोल्हापूर या २ मतदारसंघांतील ३ ठिकाणच्या मतदान यंत्रांची मॉकपॉल घेण्यात आले. यावेळी नंदाताई बाभूळकर, संतोष चौगुले यांच्याकडून प्रताप देसाई व राहुल देसाई, राजेश पाटील यांच्याकडून दिनकर सलाम, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून पुष्कराज क्षीरसागर, राजेश लाटकर यांच्याकडून विशाल चव्हाण आणि दशरथ कांबळे, अपक्ष उमेदवार शर्मिला खरात व चंद्रकांत मस्के स्वतः उपस्थित होते.उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केले १००४ मतदान उमेदवारांच्या प्रतिनिधींनी १००४ मतदान केले. व्हीव्हीपॅट मशीनमधील मतदान चिठ्ठीची आकडेवारी तंतोतंत जुळली. उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी नियंत्रण अधिकारी चंदगडचे निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. संपत खिलारी यांनी काम पाहिले.
Kolhapur: हा कसला इलेक्शन पारदर्शीपणा.. व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या का नाही दाखवल्या?; नंदाताई बाभूळकर यांचा निवडणूक यंत्रणेला प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:14 IST