कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांची ‘मित्र’ या संस्थेच्या उपाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्याने माजी नगरसेवक सत्यजित ऊर्फ नाना कदम यांची राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदांवरील नियुक्ती सोपी झाली आहे. महायुतीमध्ये महामंडळासह शासकीय समित्यांच्या पद वाटपाचा फाॅर्म्युला १०:६:४ असा निश्चित झाला असून अधिवेशनानंतर हळूहळू नियुक्त्या केल्या जाणार आहेत.आमदार क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सहा वर्षे संधी मिळाली. विशेष म्हणजे ‘नियोजन’सह ‘मित्र’ या संस्थेचे उपाध्यक्षपदही त्यांना मिळाले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आग्रही असलेले सत्यजित कदम यांना सोबत घेऊन क्षीरसागर यांनी आपले गणित सोपे केले. कदम हे भाजपमधून शिंदेसेनेत दाखल होताना, त्यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून संधी देण्याचा ‘शब्द’ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यामुळे गेली तीन महिने कदम यांचे प्रयत्न सुरू आहेत.
आमदार क्षीरसागर यांनी मंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पण, यामध्ये प्रकाश आबिटकर यांनी बाजी मारली. किमान राज्य नियोजन व ‘मित्र’ ही दोन पदे तरी आपल्याकडे असावीत, असा त्यांचा आग्रह होता त्यासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नशील होते. पण, एकाच व्यक्तीकडे दोन पदे देता येणार नसल्याने क्षीरसागर यांची ‘मित्र’ संस्थेवर फेरनियुक्ती केली. नव्या रचनेत ‘मित्र’ संस्थेला महत्त्व आहे. धोरण ठरविणे व त्याची अंमलबजावणीत त्यांचा पुढाकार राहील. त्यांचे काम नीती आयोगाच्या धर्तीवर राहणार असल्याने क्षीरसागर यांच्या पदालाही महत्त्व आहेच परंतु त्याचे ती वाटेकरी केले आहेत. त्यांच्यासमवेतच दिलीप वळसे-पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांचीही वर्णी या संस्थेवर लागली आहे. या तिघांत जिल्हे व विषयांचे वाटप केले जाऊ शकते.क्षीरसागर यांची ‘मित्र’वरील नियुक्ती कायम झाल्याने सत्यजित कदम यांचे गणित सोपे झाल्याचे मानण्यात येेते. कदम यांच्याकडून नियुक्तीबाबतची सर्व कागदपत्रे मागवून घेतली आहेत.महायुतीला मोठे बहुमत मिळाल्याने महामंडळासाठी आमदारांसह पहिल्या फळीतील पदाधिकारी इच्छुक आहेत. तिन्ही पक्षाकडे प्रत्येकाने फिल्डिंग लावली आहे. महायुतीच्या फाॅर्मु्ल्यानुसार महामंडळासह शासकीय समित्यांवर भाजपला १०, शिंदेसेनेला ६ राष्ट्रवादी काँग्रेसला ४ महामंडळांवर संधी मिळणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
भाजपचाच राहणार वर्चष्मामंत्रिमंडळातील स्थान व शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिलेली खाती पाहता, महामंडळ नियुक्तीवर भाजपचाच वरचष्मा राहणार हे निश्चित आहे. मुख्यमंत्री ज्या पक्षाचा असतो, त्याच पक्षाकडे ‘नियोजन’चे उपाध्यक्षपद असते असा संकेत आहे. त्यामुळे हे पद कदम यांना मिळावे यासाठी शिंदेसेनेला ताकद लावावी लागेल, असे दिसते.