कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाला मुंबईत आल्यास गय केली जाणार नसल्याची धमकी दिली आहे. यावरून अजित पवार मराठाव्देषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना मराठा समाज मागासच रहावा, त्यांच्या घरात कामाला जावा, असे वाटत आहे. मात्र आम्ही त्यांच्या धमकीला भीक घालणार नाही. २० जानेवारीला मुंबईला धडक देवून ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक आणि अॅड. बाबा इंदूलकर यांनी मंगळवारी दिली. पवार यांच्या मराठा विरोधी वक्तव्याचा त्यांनी निषेध नोंदवला.ते म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, असे अजित पवार सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना कायद्याचे शून्य ज्ञान आहे. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळते. इतर प्रवर्गातून दिले तर ते कोर्टात टिकत नाही. त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे नाही, म्हणजे न टिकणारे आरक्षण द्यायचे आहे का ? अजित पवार हे गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केले आहेत. जेलमध्ये जायला नको म्हणून ते भाजपच्या वळचणीला गेले आहेत.कोणत्याही दबावाला, धमकीला न घाबरता मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईला जाणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाहीत. समाजाला कोणी उचकटण्याचा प्रयत्न केला तर काहीही फरक पडणार नाही. छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे यांच्या सारखे काही ओबीसी समाजाचे नेते समाजा समाजात भांडणे लावण्यासाठी २० जानेवारीलाच मुंबईत ओबीसी समाजही जाईल, असे म्हणत आहेत. मात्र त्यांना ओबीसी समाज साथ देणार नाही.
मुंबईत धडकणारच, अजित पवारांच्या धमकीला भीक घालत नाही; कोल्हापुरातील सकल मराठा समाज आक्रमक
By भीमगोंड देसाई | Updated: January 9, 2024 14:23 IST