विश्वास पाटीलकोल्हापूर : तो घरातून बाहेर पडताना कधीच आई-वडिलांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडला नाही. त्याला हे कुणी सांगितले नव्हते; परंतु त्याच्यावर संस्कारच तसे झाले होते.. शनिवारी तो आंबोलीला जाताना आईला नमस्कार करून बाहेर पडला; परंतू वडिलांना भेटला नाही.. कदाचित, वडिलांची भेट झाली असती तर आंबोलीचा दौरा आणि पुढचे सारेच टळले असते; पण नियतीच्याच मनात तसे नव्हते आणि परवाच्या रविवारी आंबोलीहून कोल्हापूरकडे परतणाऱ्या सिद्धेश विलास रेडेकरचा अपघातीमृत्यू झाला.सिद्धेश हा डी.वाय.पाटील कॉलेजमध्ये आर्किटेक्टच्या चौथ्या वर्षात शिकत होता. शिक्षणातही तो हुशार होता. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा.. स्वच्छंदी.. मित्रांच्या मदतीला धावून जाणारा.. एखाद्याकडे गाडी नसेल तर त्याला घरी सोडून मगच घरी जाणारा.. कॉलेजमधून बाहेर पडला की आईला फोन करणार.. आई आलोच, मला जेवायला वाढून ठेव असे सांगणार.. घरी आले की आईला कडकडून मिठ्ठी मारणार, तिच्यावर जीवापाड प्रेम करणार ही त्याची सवयच. आता तो नाही हे स्वीकारणेच रेडेकर पती-पत्नीला सहन करण्याच्या पलीकडे. विलास रेडेकर हे कोल्हापुरातीलच प्रख्यात बांधकाम व्यावसायिक. ते मूळचे करवीर तालुक्यातील नंदगावचे. शेतकरी कुटुंबातील. ते चांगले शिकले आणि स्वत:च्या हिमतीवर आयुष्य उभे केले. दोन्ही मुलींना चांगले शिकवले. मोठे झाले; परंतु गावाचे ऋण कधीच विसरले नाहीत. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास इतका की, कोणतीही अडचण आली तर त्यावरील उपाय ते नक्की सुचविणार. हात स्वच्छ असल्याने महापालिका सेवेत ते फार रमले नाहीत आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. त्यात नाव कमावलेच; परंतु माणसांचा गोतावळाही खूप जमा केला.. त्यामुळेच गेली चार दिवस त्यांच्या राजाराम रायफल्स परिसरातील घरात लागलेली लोकांची रीघ तुटलेली नाही. बुधवारी रक्षाविसर्जनानंतरही हेच चित्र त्यांच्या घरी होते. लोक भेटायला येतात त्यातून सिद्धेशच्या आठवणींचा कोलाहल पुन्हा त्यांच्या मनात कालवाकालव करतो. डोळे कधी वाहू लागतात हेच त्यांना कळत नाही. कोणत्याही बापाच्या वाट्याला असे दु:ख परमेश्वराने कधीच आणू नये, अशी भावना सर्वच व्यक्त करतात; परंतु नियतीपुढे कुणाचेच काही चालत नाही.
यातून जास्तच रक्तबंबाळ..अपघातानंतर बड्या घरचा मुलगा, बापाने १२ लाखांची गाडी दिली म्हणून असे घडले अशा आरोपांच्या फैरी समाजमाध्यमांवर उमटल्या. आधीच दु:खाने मोडलेल्या रेडेकर कुटुंबीयांना या आरोपांनी अधिकच रक्तबंबाळ केले. मुलाला रायडिंगची आवड होती म्हणून वडिलांनी हौसेने ही गाडी घेऊन दिली. पुढे हे त्याच्या वाट्याला येणार असे कुणाच्याही आई-वडिलांना थोडेच माहीत असते का?, जे घडायचे असते त्याला कोणीच रोखू शकत नाही हेच यातील जास्त खरे.. अशा प्रतिक्रिया समाजातून उमटत आहेत.