समीर देशपांडेकोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या महायुतीने महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील एकमेव मातब्बर नेते आणि विधान परिषदेचे गटनेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांची कोंडी करण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीलाही मोठे महत्त्व येणार आहे.नोव्हेंबर २०२७ ला विधान परिषदेची निवडणूक होईल. गतवेळी राज्य पातळीवरील गणितातून अमल महाडिक यांनी माघार घेतली आणि सतेज पाटील बिनविरोध आमदार झाले होते. त्याच्या बरोबर उलट राजकीय स्थिती सध्या कोल्हापूर जिल्ह्यात आहे. जरी या निवडणुकीला अजूनही सव्वादोन वर्षे असली, तरी निवडून येणारे ४८९ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यच त्यावेळी मतदान करणार आहेत.कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीने ताकद लावली आहे. गेल्या निवडणुकीत भाजप, महाडिक यांच्या ताराराणी आघाडीने लक्षणीय जागा मिळवल्या होत्या. त्यावेळी सतेज पाटील यांच्यासोबत हसन मुश्रीफ होते. तसेच त्यावेळी सोबत असलेले राजेश क्षीरसागर आता महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी आसुसलेले आहेत. इचलकरंजीमधील पारंपरिक विरोधक माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर एकत्र आले आहेत.जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि गणपतराव पाटील एकत्र होते. परंतु, आता तशी स्थिती राहिलेली नाही. कागलमध्ये मुश्रीफ यांची सत्ता होती. गडहिंग्लजला जनता दलाची सत्ता हाेती आणि सध्या ही मंडळी सतेज यांच्यासोबत आहेत. परंतु, येथे मुश्रीफ यावेळी जोरदार ताकद लावणार हे नक्की. हुपरीला भाजपची सत्ता होती आणि आवाडे यांचे पाच नगरसेवक होते. आता सर्वजण एकत्र राहतील.
शिरोळ नगरपंचायतीसाठी यड्रावकर, गणपतराव पाटील, राजू शेट्टी एकत्र होते. परंतु, त्यात बदल होण्याचीच अधिक शक्यता आहे. पेठवडगावला युवक क्रांती आघाडी सत्तेत होती. येथील यादव गट सतेज यांच्यासोबतच राहील. कुरूंदवाडला काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. मुरगुड येथे प्रा. संजय मंडलिक म्हणजे शिवसेनेची सत्ता होती. मलकापूरला जनसुराज्य भाजपची सत्ता होती, तर पन्हाळ्याला जनसुराज्यची एकतर्फी सत्ता होती.आजऱ्यामध्ये भाजप-काँग्रेसची सत्ता होती. तर, हातकणंगलेमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि १४ नगरसेवक भाजप शिवसेनेचे होते. चंदगडला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती. यात अनेक ठिकाणी आता महायुती म्हणून प्राधान्य दिले जाईल.
३६० अंशाने राजकीय स्थिती बदललीशिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली आणि या दोन्हीतील मातब्बर नेते भाजपसोबत महायुतीत आले. सतेज पाटील यांना पाठबळ देणारे हसन मुश्रीफ सध्या महायुतीचे जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत. शिंदेसेनेचे प्रकाश आबिटकर पालकमंत्री आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जोडण्या घालायला सुरू केल्या आहेत. विधानसभेचे सर्व म्हणजे १० आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळेच येणारी विधान परिषद निवडणूक आपल्यासाठी सोपी करण्यासाठी महायुतीच्या हालचाली राहणार आहेत.
इतके सदस्य करणार विधान परिषदेला मतदान
- कोल्हापूर महापालिका - ८१
- जिल्हा परिषद सदस्य - ६८
- इचलकरंजी महापालिका - ६५
- जयसिंगपूर - २६
- कागल - २३
- गडहिंग्लज - २२
- हुपरी - २१
- शिरोळ - २०
- पेठ वडगाव - २०
- कुरूंदवाड - २०
- मुरगूड - २०
- मलकापूर - २०
- पन्हाळा - २०
- आजरा - १७
- हातकणंगले - १७
- चंदगड - १७
- सभापती - १२
- एकूण - ४८९