आदित्य वेल्हाळ कोल्हापूर : कोल्हापूरची जीवनदायिनी ठरलेल्या राधानगरीधरणातील शाहू महाराजांची आवडती वास्तू असणाऱ्या बेनजर व्हिलाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून पुरातत्त्व विभागाच्या बेदखलपणामुळे ही वास्तू अस्तित्वासाठी लढत आहे. सहजासहजी न दिसणारे, दृष्टी एका जागी राहू न शकणारे अप्रतिम सौंदर्य म्हणजे ‘बेनजर,’ या अर्थाने शाहू महाराजांनी या वास्तूला ‘बेनजर व्हिला’ हे नाव दिले. १९१२ साली शाहू महाराजांनी केलेल्या एका ठरावात या नावाचा उल्लेख आहे. कोल्हापुरातील पुराभिलेख कार्यालयात हा ठराव उपलब्ध आहे. मात्र, अपभ्रंश होऊन ‘बेनझीर’ हे नाव प्रचलित झाले. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याची मागणी शाहूप्रेमींनी गेल्या पाच वर्षांपासून लावून धरली आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाला शाहू महाराजांच्या या ऐतिहासिक वास्तूबद्दल ममत्वच नसल्याने ही वास्तू काळाच्या उदरात लोप पावत आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर १९०८ साली शाहू महाराजांनी राधानगरीधरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. हे काम महाराजांच्या हयातीत पूर्ण झाले नाही; मात्र छत्रपती राजाराम महाराजांनी धरणाचे काम पूर्ण केले. धरणाच्या परिसराची नैसर्गिक संपन्नता व धरणाच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी धरणाच्या हद्दीत टेकडीवर हा बंगला बांधला. पाणीसाठा वाढल्यामुळे बेनजर व्हिला बॅकवॉटरच्या मधोमध आला आहे.एकीकडे सरकार पर्यटनाच्या नावाखाली इव्हेंट करून कोट्यवधी रुपयांची उधळण करत असताना दुसरीकडे अशा अप्रतिम वास्तूंकडे मात्र साेयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. आता ही वास्तू जतन करण्यासाठी शाहूप्रेमींनी पुढे येण्याची गरज आहे.
भिंतीचे दगड निखळलेबेनजर व्हिला १९७५, २०१६, २०१९ व आत्ता २०२३ ला चौथ्यांदा पाणीसाठा कमी झाल्यामुळे खुला झाला. हा बंगला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. चहूबाजूंनी कायम पाणी असल्याने दुर्लक्षित राहिलेली ही वास्तू आत्ता फारच दयनीय अवस्थेत आहे. पाऊस, वाऱ्याचा मारा, दगडी भिंतींवर झाडांची मुळे व पारंब्या पसरल्यामुळे भिंतीचे दगड निखळू लागले आहेत. आणखी काही वर्षांत ही वास्तू ढासळण्याचा धोका आहे.
लक्ष्मी तलावाच्या हद्दीतील बेनजर व्हिलासाठी लागणारी सागवानाची लाकडे पुंगाव (ता. राधानगरी) हद्दीतील जंगलातून घ्यावीत, असा ठराव शाहू महाराजांनी १९१२ साली केला होता. या ठरावातील कागदपत्रांवर ‘बेनजर व्हिला’ असा उल्लेख आहे. - गणेश खोडके, अभिलेखाधिकारी, पुराभिलेख कार्यालय, कोल्हापूर.