कोल्हापूर : संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या वादळी जीवनावरील ‘छावा’ चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. या पार्श्वभूमीवर ज्यांनी ही कादंबरी लिहिली ते कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्याचे सुपुत्र असलेले शिवाजीराव सावंत यांची मूळ कादंबरीही चर्चेत आली आहे. या कादंबरीचीही मागणी वाढली असून, सध्या ती उपलब्ध नसल्याने वाचकांना या ‘छावा’ची प्रतीक्षा करावी लागत आहे. मेहता प्रकाशनाकडून सध्या या कादंबरीची छपाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.विकी कौशल अभिनित ‘छावा’ चित्रपटाच्या सुरुवातीला शिवाजी सावंत यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. सावंत यांनी १९७९ साली ही कादंबरी लिहिली. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते ‘छावा’च्या हस्तलिखिताचे पूजन करण्यात आले होते. हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, मल्याळम या भाषांमध्ये ही कादंबरी अनुवादित झाली आहे. यानंतर राज्यातील प्रत्येक ग्रंथालयात आणि वैयक्तिकरीत्याही या कादंबरीवर अक्षरश: वाचकांच्या उड्या पडल्या होत्या. याच कादंबरीवर आधारित ‘छावा’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत आणि त्यांची ही कादंबरी चर्चेत आली आहे.हा चित्रपट पाहिल्यानंतर आणि त्याबद्दल वाचल्यानंतर या कादंबरीची मागणी वाढली आहे. परंतु, याची जुनी आवृत्ती संपली असून, नव्या आवृत्तीची छपाई सुरू आहे. त्यामुळे आणखी काही दिवस वाचकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. याआधी कोल्हापूरमध्ये महिन्याला छावा कादंबरीच्या १५/२० प्रती विकल्या जात होत्या. परंतु, आता आठवड्याला २५/२५ जणांची या कादंबरीसाठी चौकशी सुरू आहे.
मोदींकडून सावंत यांचा उल्लेखदिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी छावा कादंबरी आणि लेखक शिवाजीराव सावंत यांचा उल्लेख केल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक वाचकांनी आनंद व्यक्त केला आहे. सावंत यांच्या ‘मृत्युंजय’पासून ते ‘छावा’पर्यंतच्या अनेक आठवणी आणि मोदी यांचे भाषण व्हायरल झाले आहे.
संभाजी महाराजांवरील अन्य पुस्तकेही चर्चेतविश्वास पाटील - संभाजी, वा. सी बेंद्रे - छत्रपती संभाजी महाराज, डॉ. सदाशिव शिवदे - ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा, डॉ. सदाशिव शिवदे - रणझुंजार शंभुछत्रपतींच्या समशेरीची गाथा, नऊ इतिहास अभ्यासक - श्री शंभू छत्रपती स्मारक ग्रंथ, सुशांत उदावंत - राष्ट्रवीर छत्रपती संभाजीराजे, मेधा देशमुख - भास्करन- छत्रपती संभाजी : जीवन आणि बलिदान, राजकुंवर बोबडे - शिवपुत्र, गोविंद सरदेसाई - छत्रपती संभाजी महाराज, डॉ. कमल गोखले - शिवपुत्र संभाजी, संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेतील ग्रंथ बुधभूषण या पुस्तकांचीही मागणी वाढली असल्याचे सांगण्यात आले.