कोल्हापूर : गिरोली घाटात काल, मंगळवारी (दि.२०) रात्री प्रेयसीचा गळा आवळून खून करून स्वत:ही विषप्राशन केलेल्या तरूणाचा आज, बुधवारी सकाळी उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. संशयित कैलास आनंदराव पाटील (वय ३०, लिंगनूर, ता. कागल) असे मृत तरूणाचे नाव आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी सीपीआरमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती.पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, यातील संशयित कैलास पाटील व ऋतुजा प्रकाश चोपडे हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. तीन वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबध होते. ऋतुजाच्या आई वडीलांनी या लग्नास प्रथम होकार दिला होता. मात्र, काही दिवसानंतर संशयित काहीच कामधंदा करीत नसल्याचे कारण सांगत लग्नास विरोध केला. याचा राग कैलासच्या मनात होता.दरम्यान मंगळवारी सायंकाळी ऋतुजाला त्याने महाविद्यालयातून फिरण्यास नेले. गिरोली घाटातील पांडवलेणी येथे निर्जनस्थळी तिचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून खून केला. खुनानंतर त्याने मोबाईलवरून नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये मला माफ करा मी जात आहे. त्यानंतर त्याने आपल्या मोबाईल स्टेटसवरही तसा संदेश लिहिला. ही बाब मृत ऋतुजाच्या वडीलांना याच ग्रुपवरून समजली. त्यांनी थेट पेठवडगाव पोलीस ठाण्याकडे मदत मागितली. मोबाईल लोकेशनवरून घटनास्थळ शोधले. या दरम्यान कोडोली पोलिस ठाण्याचे पोलिसही या घटनास्थळी दाखल झाले.या ठिकाणी संशयित कैलास हा अत्यवस्थ आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ग्रामोझोन हे विषारी किटकनाशक प्राशन केल्याचे सांगितले. त्वरीत संशयिताला रात्री सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान आज, बुधवारी सकाळी ९ वाजता त्याचा मृत्यू झाला. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.नातेवाईकांची गर्दीशवविच्छेदनानंतर प्रथम ऋतुजाचा मृतदेह दुपारी एक वाजता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली. तर त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संशयित कैलासचाही मृतदेह ताब्यात दिला. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याने सीपीआर परिसरात नातेवाईकांनी गर्दी केली होती.
कोल्हापूर: प्रेयसीचा खून करुन केला होता आत्महत्येचा प्रयत्न, अखेर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
By सचिन भोसले | Updated: September 21, 2022 15:49 IST