ठाकर समाजबांधव आक्रमक-: जातवैधता प्रमाणपत्राबाबत तक्रार

By Admin | Updated: July 28, 2014 23:15 IST2014-07-28T22:00:04+5:302014-07-28T23:15:06+5:30

आंदोलन छेडण्याचा इशारा

Thackeray-Samajwadi attacker-: Complaint about caste certificate | ठाकर समाजबांधव आक्रमक-: जातवैधता प्रमाणपत्राबाबत तक्रार

ठाकर समाजबांधव आक्रमक-: जातवैधता प्रमाणपत्राबाबत तक्रार

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेला आहे. तरीही अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग ठाणे यांच्याकडून ठाकर जमातीतील अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात येत नाही. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे १० आॅगस्ट २०१४ पर्यंत तपासणी समितीत जातवैधता देण्यास भाग पाडावे अन्यथा ११ आॅगस्टपासून जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाजाचे अध्यक्ष साबाजी बाबुराव मसके यांनी शासनास दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत आज निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांची भेट घेत निवेदन सादर केले. सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९७६ च्या घटना आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर जमातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केलेला आहे. तथापी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग ठाणे यांच्याकडून ठाकर जमातीतील अर्जदारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यात येत नाही. ही घटनाविरोधी गंभीर बाब आहे. तपासणी समितीच्या या आडमुठ्या धोरणामुळे ठाकर समाजातील ज्ञातीबांधवांचे अतोनात नुकसान होत आहे. तरुण सुशिक्षित तरुणांची शासनाच्या सेवेत निवड झालेली असून जातवैधता प्रमाणपत्र अभावी त्यांना नियुक्त्या मिळत नाहीत. काही ज्ञातीबांधवांच्या पदोन्नती रोखण्यात आलेल्या आहेत. तर काही ज्ञातीबांधवांना तीस तीस वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांना सेवेतून का कमी करण्यात येवू नये अशा नोटीसा देऊन त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. ही ठाकर समाजाची पिळवणूक आहे. या अन्यायाविरोधात वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन दरबारी तयाची दखल घेतली जात नाही. १० आॅगस्टपूर्वी तपासणी समितीस जातवैधता देण्यास भाग पाडावे. जिल्ह्यातील ठाकर समितीवर होणारा अन्याय दूर करून न्याय द्यावा अन्यथा ११ पासून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
-..अशी असेल आंदोलनाची रूपरेषा
११ आॅगस्ट रोजी सकाळी हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततापूर्ण मोर्चा नेणे व ६ वाजेपर्यंत उपोषणास बसणे
- त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजल्यापासून १४ आॅगस्टपर्यंत सकाळी उपोषणास बसणे.
- १४ रोजीपासून जिल्हा कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषणास बसणे.
- १५ व १६ आॅगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने ठाकर समाज काळ्या फिती लावून निदर्शने करणार आहेत. त्याचदिवशी सभासद मुंडण करून जिल्हा कार्यालयासमोर राज्य शासनाच्या विरोधात घोषणा देणार आहेत. आवश्यकता भासल्यास रास्ता रोकोही करण्यात येणार आहे.

Web Title: Thackeray-Samajwadi attacker-: Complaint about caste certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.