ठाकरे आणि फडणवीसांची साडेतीन मिनिटांची भेट चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST2021-07-31T04:24:06+5:302021-07-31T04:24:06+5:30
कोल्हापूर : येथील पूरस्थिती पाहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र ...

ठाकरे आणि फडणवीसांची साडेतीन मिनिटांची भेट चर्चेत
कोल्हापूर : येथील पूरस्थिती पाहण्यासाठी आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी शाहूपुरीतील साडेतीन मिनिटांची भेट राज्यभर चर्चेत आली. ‘उद्धवजींचा निरोप आला, तुम्ही कुठे आहात, तेथे थांबा. मी तिकडेच येत आहे. मग आमची भेट झाली,’ असे स्पष्ट करून फडणवीस यांनी ही भेट कशी घडली, हे सांगून टाकले. या भेटीत ठाकरे यांनी फडणवीस यांना महापुराचे नियोजन आपण एकत्रित बसून करू, या असे सुचविले व त्यासाठी मुंबईत पुन्हा भेटण्याचे ठरले.
फडणवीस हे चिखली, आंबेवाडीला भेट देऊन कोल्हापुरातील शाहूपुरीतील कुंभार गल्लीत आले. तेथे त्यांनी नागरिक, व्यापारी यांच्याशी चर्चा सुरू केली. त्यांचे म्हणणे ऐकत असतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा त्याच ठिकाणी आला. यावेळी या ठिकाणी शिवसेना, काँग्रेसचे नेते, आमदार उपस्थित होते. आता नेमके काय होणार, हे दोघे भेटणार का, याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली. मुख्यमंत्री ठाकरे गाडीतून उतरले. त्यांच्याआधीच मिलिंद नार्वेकर उतरले. त्यांनी अधिकाऱ्यांना फडणवीस कुठे आहेत, अशी विचारणा केली. पोलीस अधिकारीही भांबावले. समोर पोलिसांनी अडथळे लावले होते. नार्वेकर यांनी ते काढायला लावले. नार्वेकर स्वत: फडणवीस यांच्याकडे गेले. ठाकरे आलेत म्हटल्यानंतर फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्याकडे येण्यासाठी निघाले. हा क्षण टिपण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची प्रचंड धावपळ उडाली. यावेळी साडेतीन मिनिटे ठाकरे-फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आणि फडणवीस येथून रवाना झाले.