कामगारांचा प्रभाव असणारी वस्त्रोद्योगनगरी
By Admin | Updated: October 7, 2014 00:46 IST2014-10-07T00:02:20+5:302014-10-07T00:46:31+5:30
शहरी, ग्रामीण मिलाप : कॉँग्रेसचा प्रभाव, तरीही अपवादात्मक धक्के

कामगारांचा प्रभाव असणारी वस्त्रोद्योगनगरी
राजाराम पाटील - इचलकरंजी
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेतंर साधारणत: ८० टक्के शहरी आणि २० टक्के ग्रामीण मतदारसंघ झाला. कबनूर व कोरोची गावांचे स्वतंत्र अस्तित्व असले, तरी इचलकरंजीतील वसाहती आणि या दोन्ही गावांचा वाढीव परिसर परस्परांत मिसळल्याने शहरातील राजकीय परिणामांचे पडसाद तेथेही उमटतात. गत निवडणुकीत जिल्ह्यात प्रथमच भाजपचे कमळ इचलकरंजीत उमलले. सध्या भाजप, शिवसेना, राष्ट्रीय व राष्ट्रवादी असे चारही उमेदवार निवडणुकीत असल्याने कमालीची चुरस आहे. मतदारसंघावर कॉँग्रेसचेच वर्चस्व आहे. बाबासाहेब खंजिरे, दत्ताजीराव कदम, कल्लाप्पाण्णा आवाडे यांचाच प्रभाव आहे. तरीही दोनवेळा माकपने आणि भाजपने बाजी मारली. शहरासह पाच गावांच्या परिसरात कुंभार व माने गटांचेही अस्तित्व आहे. येथे कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, स्वाभिमानीची आता लक्षणीय ताकद आहे.
कष्टकरी ते कोट्यधीश
इचलकरंजीतील झोपडपट्ट्यांमध्ये कष्टकरी, रोजंदारी, मोलमजुरी करणारा कामगार, तर महावीर कॉलनी, महेश कॉलनी आणि करोडपती कॉलनीमध्ये कोट्यधीशांची वस्ती आहे.
मतदारसंघाची रचना
इचलकरंजी नगरपालिका क्षेत्र, चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी, तारदाळ यामध्ये तालुका पंचायतीचे चार पूर्ण मतदारसंघ आणि रेंदाळ तालुका पंचायतीतील चंदूर हे एकच गाव समाविष्ट आहे.
मतदारसंघातील समस्या
इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे शहर असल्याने येथे वीज, रस्त्यांबरोबर स्वच्छ व पुरेशा पाण्याची आवश्यकता. पाण्याचा प्रश्न ग्रामीण परिसरासही भेडसावतो आहे. शहरालगत झोपडपट्ट्या वाढत असल्याने घरकुलांची समस्या.
शहापूर ठाण्याला पोलीस हवेत
वस्त्रोद्योगात वाढती गुंडगिरी ही मोठी समस्या आहे. तसेच काही विभागात फाळकूटदादांची गुंडगिरी असल्याने विशेषत: नव्यानेच झालेल्या शहापूर पोलीस ठाण्याला आवश्यक अशा पुरेशा कर्मचारी वर्गाची उणीव आहे.
वस्त्रोद्योग आणि साखर कारखानाही
वस्त्रनगरी असल्याने सहकार क्षेत्रातील सूतगिरण्यांचा प्रभाव असला, तरी पंचगंगा सहकारी साखर कारखाना मतदारसंघात आहे. कारखान्यावर पूर्वाश्रमीच्या कुंभार गटाची सत्ता असून, अध्यक्ष पी. एम. पाटील यांचाही गट कबनूरसह ग्रामीण भागात कार्यरत आहे. सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅँकांबरोबर खासगी बॅँकांचेही मोठे जाळे इचलकरंजीत आहे.
राष्ट्रवादीत फाटाफूट
सात नगरसेवक मदन कारंडेंसोबत, ३ नगरसेवक आवाडेंकडे, १ नगरसेवक भूमिका गुलदस्त्यात
‘शविआ’मध्ये फाटाफूट
१२ नगरसेवक हाळवणकरांकडे
२ नगरसेवक जाधवांबरोबर
४ नगरसेवक कॉँग्रेसच्या आवाडेंकडे
नगरसेवकांची वर्गवारी
कॉँग्रेस २, राष्ट्रवादी ११
शहर विकास आघाडी १७
कॉँग्रेसचे सर्व २९ नगरसेवक प्रकाश आवाडेंबरोबर. याशिवाय ‘शविआ’मधील चौघेजण कॉँग्रेसमध्ये आले असून, आणखी आवाडेंच्या सोबत येण्याची शक्यता.