तीन तालुक्यांतील मजुरांची ‘नरेगा’कडे पाठ

By Admin | Updated: December 29, 2014 00:11 IST2014-12-28T23:45:10+5:302014-12-29T00:11:23+5:30

सधनतेमुळे प्रतिसाद कमी : ५० हजार क्रियाशीलपैकी १३४७ मजूर कामावर

Text to NREGA in three talukas | तीन तालुक्यांतील मजुरांची ‘नरेगा’कडे पाठ

तीन तालुक्यांतील मजुरांची ‘नरेगा’कडे पाठ

भीमगोंडा देसाई-कोल्हापूर -जिल्ह्यातील शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ या तीन तालुक्यांतील मजुरांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून (नरेगा) काम करण्याकडे पूर्णपणे पाठ फिरविली आहे. परिणामी, तीन तालुक्यांत या योजनेतून एकही काम सध्या सुरू नाही. याउलट उर्वरित ९ तालुक्यांत १३४७ मजूर ९१ विविध कामे करत आहेत. जिल्ह्यात एकूण ५० हजार ७०० क्रियाशील मजूर आहेत. मात्र, सधनतेमुळे प्रत्यक्ष कामावरील मजुरांची संख्या कमी आहे.
‘मागेल त्याला काम मिळावे’, यासाठी केंद्र सरकारने ‘नरेगा’ योजना सुरू केली. ही योजना दुष्काळी आणि दरडोई उत्पन्न कमी असलेल्या जिल्ह्यात वरदान ठरली आहे. या योजनेतून काम करणाऱ्या मजुरांना दिवसाला १६८ रुपये मजुरी दिली जाते. योजनेतून रोपवाटिका, वृक्षलागवड, सिंंचन विहीर, रस्ते, राजीव गांधी भवन, विहीर पुनर्भरण, शेततळी, समतलचर, नालाबांध, फळबाग लागवड, पाझर तलावातील गाळ काढणे व दुरुस्ती करणे, नवीन पाझर तलावाची खुदाई करणे, कालवे दुरुस्ती अशी कामे करण्यास परवानगी आहे. ग्रामपंचायत व अन्य शासकीय यंत्रणेच्या नियंत्रणाखाली कामे होतात.
अलीकडे योजनेच्या अंमलबजावणी पारदर्शकतेवर लक्ष केंद्रित केले आहे. मजुरांच्या बँक खात्यावरच थेट मजुरी जमा होत आहे. त्यामुळे मजुरीच्या रकमेसाठी ‘चिरीमिरी’ देण्यातून सुटका झाली आहे. परिणामी, काही तालुक्यांत योजनेच्या कामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जिल्ह्यात सध्या सर्वाधिक कामे राधानगरी, भुदरगड तालुक्यांत सुरू आहेत. शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील मजुरांनी कामाची मागणी केलेली नाही. त्यामुळे एकही काम सुरू नसल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत उसाचे क्षेत्र अधिक आहे. आर्थिक सुबत्ता चांगली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत कायमच ‘नरेगा’कडे मजूर पाठ फिरवत असतात. शाहूवाडी तालुक्यात भात व इतर पीक काढणीची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे डोंगरी तालुका असूनही शाहूवाडी तालुक्यातील मजुरांनी ‘नरेगा’च्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. सर्वसाधारणपणे सर्वच तालुक्यांत तीन वर्षांत एक दिवस काम केलेल्या क्रियाशील मजुरांच्या एकूण संख्येच्या तुलनेत कामावर असलेल्या मजुरांची संख्या नगण्य आहे.


जिल्हा सधन आहे. त्यामुळे अनेक तालुक्यांत ‘नरेगा’च्या कामांना प्रतिसाद कमी आहे. ज्या तालुक्यात मागणी आहे, तेथे कामे सुरू आहेत.
- विद्युत वरखेडकर,
उपजिल्हाधिकरी (नरेगा)

Web Title: Text to NREGA in three talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.