टेस्ट सक्तीने, लसीकरण वशिल्याने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST2021-07-11T04:17:56+5:302021-07-11T04:17:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील अगदी सुरुवातीपासून सुरू असणारा लसीकरणातील गोंधळ व ...

टेस्ट सक्तीने, लसीकरण वशिल्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील अगदी सुरुवातीपासून सुरू असणारा लसीकरणातील गोंधळ व आंधळा कारभार कायम आहे. ‘ज्याचा आहे वशिला त्यानच जावं लसीला’ असा प्रत्यय प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळत आहे.
दरम्यान, लसीकरणासाठी आरोग्य केंद्रात आलेल्यांना व कामानिमिताने शहरातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची जबरदस्तीने कोरोना चाचणी केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व हुपरी पोलिसांकडून होत असलेल्या अरेरावीला परिसरातील नागरिक वैतागून गेले आहेत.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे दररोज कोविड चाचणीची २०० किट येतात. ही किट संपविण्यासाठी हुपरी पोलीस ठाणे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून दररोज प्रयत्न करतात. लसीकरणासाठी आलेल्यांना आरोग्य केंद्रातील कर्मचारी लस पाहिजे असेल तर आधी चाचणी करुन घ्या, असा नियम लावतात. काही कामानिमिताने घराबाहेर पडलेल्या वाहनधारकांच्या बखोटीला धरुन कोविड चाचणी करण्यासाठी पोलीस ठाणे आवारात पोलीस अक्षरशः उचलून व फरपटत नेतात. कोविड अँटिजन चाचणी करून झाल्यानंतर त्याचा निकाल स्पिकरवरून अगदी दणक्यात जाहीर करतात. पोलीस रस्त्यावरून लोकांना उचलून शंभरावर चाचण्या करतात व प्राथमिक आरोग्य केंद्रात शंभरावर चाचण्या केल्या जातात. असा मिळून दररोज २०० टेस्ट किटचा हिशेब प्रशासनाला देतात. प्रशासनाला हिशेब देण्यासाठी पोलीस व आरोग्य यंत्रणा जर अशी चुकीची पद्धत अवलंबत असेल तर सामान्य माणसाने कुणाकडे दाद मागायची? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या कामाच्या सोयीमध्ये नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यपध्दतीवर तर संशोधनच करण्याची गरज निर्माण झाली आहे. रस्त्यावर पोलिसांची दमदाटी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांचे बोलणे खावे लागत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.