कोल्हापूर : सार्वजनिक गणेश विसर्जन तरुण मंडळांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पापाची तिकटी येथे विनापरवाना स्वागत मंडप उभारून वाट बंद केल्याने आज, शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास बजाप माजगावकर तालमीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंडप उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक व तालमीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने व शाब्दिक वादावादी झाल्याने तणाव वाढला. नगरसेवकांनी सामंजस्याची भूमिका घेत उभारलेल्या जागेवरील मंडप हलवून बाजूला सरकविल्यानंतर वातावरण शांत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाद्वार रोड ते जुना बुधवार तालीमकडे जाणाऱ्या रस्त्यावर पापाची तिकटी येथे शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास रस्ता अडवून स्वागत मंडप उभारला. सकाळी सातच्या सुमारास बजाप माजगावकर तालमीच्या कार्यकर्त्यांना मंडप घालून वाट बंद केल्याचे लक्षात आल्यानंतर ते संतप्त झाले. रस्ता अडविल्याने स्थानिक नागरिकही एकत्र आले. त्यानंतर स्वागत मंडप खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून उभारल्याचे लक्षात आल्यानंतर तालमीच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. यावेळी आमदार महाडिक यांनी माझा या मंडपाशी काही संबंध नाही. ज्या पक्षाने उभारला आहे त्यांच्या नेत्यांना तुम्ही विचारा, असे सांगितले. तेथून कार्यकर्ते माघारी पापाची तिकटी येथे आले. संतप्त कार्यकर्त्यांनी मंडपाचे पत्रे काढून तो उखडण्यास सुरुवात करताच माजी नगरसेवक विजय सरदार यांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना अडविले. पालिकेच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना त्यांनी फोनवरून ही माहिती सांगितली. या प्रकाराची माहिती समजताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तब्बल दीड तासाने राष्ट्रवादीचे नगरसेवक रमेश पोवार, आदिल फरास, प्रकाश गवंडी, श्रीकांत बनछोडे याठिकाणी आले. त्यांनी सुरुवातीस मंडप हलविता येणार नाही, अशी भूमिका घेतली. ही वादावादी सुमारे तासभर सुरू होती. संतप्त कार्यकर्त्यांनी पुन्हा मंडप उखडण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांचा संताप पाहून आपली नाचक्की होण्याच्या भीतीने अखेर नगरसेवकांनी मंडप काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महापालिकेने उभारलेला मंडप खालच्या बाजूला (उजवीकडे) सरकवून रस्ता मोकळा करून त्याठिकाणी त्यांनी मंडप उभारला. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीने उभारलेल्या स्वागत मंडपावरून तणाव
By admin | Updated: September 7, 2014 23:25 IST