महिला कर्मचाऱ्यांना गैरशब्द वापरल्याने तणाव
By Admin | Updated: September 10, 2014 23:53 IST2014-09-10T23:32:55+5:302014-09-10T23:53:48+5:30
इचलकरंजी पालिका : मुख्याधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा

महिला कर्मचाऱ्यांना गैरशब्द वापरल्याने तणाव
इचलकरंजी : शहरातील फासेपारधी समाजाच्या शिष्टमंडळाकडून नगरपालिकेकडील नगररचना विभागात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना गैरशब्द वापरल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे नगरपालिकेमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता. मुख्याधिकारी सुनील पवार यांनी या प्रकरणी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला.
शहरातील वॉर्ड नं. २० व २१ मध्ये फासेपारधी समाजाची कुटुंबे राहतात. त्यांना शासकीय योजनेतून घरकुले बांधून देण्याची मागणी गेली चार-पाच वर्षे होत आहे. घरकुले बांधण्यासाठी नगरपालिकेकडे रिकामी जागा उपलब्ध नसल्याने अखेर त्या कुटुंबांना ते सध्या राहत असलेल्या ठिकाणीच राजीव गांधी आवास योजनेतून घरकुले बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा आशयाचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरही झाला.
या पार्श्वभूमीवर फासेपारधी समाजाने नगरपालिकेकडे वॉर्ड नं. २० व २१ मध्ये पालिकेची जागा उपलब्ध नसल्याचे लेखी मागितले. त्याप्रमाणे पत्र घेऊन जाण्यासाठी फासेपारधी समाजाचे शिष्टमंडळ आज, बुधवारी सायंकाळी नगरपालिकेत आले. ते पत्र नील मुद्रक सुमन डाफळे-चौगुले यांच्याकडून घेत असताना पत्रातील मजकुराबाबत वाद निर्माण झाला. त्याचवेळी कुणीतरी यामध्ये गैरव्यवहार असल्याचे म्हटल्याने संतापलेल्या डाफळे-चौगुले यांनी त्यास आक्षेप घेतला. यावरून वाद आणखी
वाढला. अखेर हा वाद मुख्याधिकारी पवार यांच्याकडे गेला. पवार यांनी दोन्ही बाजू समजावून घेऊन त्यावर पडदा पाडला. शिष्टमंडळात मोहन काळे, लिंगाप्पा चव्हाण, शंकर चव्हाण, मंगल काळे, कला चव्हाण, आशा काळे, मालू चव्हाण, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)