डिजिटल फलकांवरून तणाव
By Admin | Updated: October 20, 2015 00:14 IST2015-10-20T00:12:34+5:302015-10-20T00:14:03+5:30
इचलकरंजीचा प्रकार : उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांच्या समर्थकांत वाद, उपअधीक्षकांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

डिजिटल फलकांवरून तणाव
इचलकरंजी : शहरात अनधिकृत डिजिटल फलकांमुळे निर्माण होणाऱ्या वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. शहापूर परिसरात लावलेल्या फलकांवरून उपनगराध्यक्ष रणजित जाधव व माजी नगरसेवक उदयसिंह पाटील या दोघांमध्ये निर्माण झालेल्या वादाने तेथे तणाव निर्माण झाला होता.
दोघांच्या समर्थकांचा जमाव समोरासमोर आल्याने स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला आणि पुढील अनर्थ टळला. याबाबत नगरपालिका व घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, नगरपालिकेने अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत फलकांच्या विरोधात मोहीम सोमवारी सकाळपासून चालू केली.
पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळील एक लोखंडे खोके जप्त केले. त्यानंतर सुंदरबागेजवळील एका नगरसेवकाच्या छबीचे डिजिटल फलक जप्त केले.
शिवाजी पुतळा चौकात असलेल्या एका सभापतीकडून शुभेच्छा देणारे फलक काढून टाकले. त्यानंतर हे पथक सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहापूर येथे गेले असताना तेथील माजी नगरसेवक उदयसिंह पाटील यांच्या समर्थकांचा डिजिटल फलक हलविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
तेव्हा पाटील यांचे समर्थक तेथे जमले व त्यांनी फलक हलविण्यास मज्जाव केला, तर तिथून जवळच असलेले उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांचे अनधिकृत फलक हलविण्याची मागणी केली.
हा प्रकार समजताच जाधव यांचेही समर्थक तेथे जमले. त्यांनी परस्परांचे फलक हटविण्याची मागणी केली.
यामुळे घटनास्थळी वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला. तेथे मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने गर्दी झाली. त्यामुळे शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश पवार व उपअधीक्षक नरळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उपअधीक्षक नरळे यांनी हस्तक्षेप करून दोघांचेही फलक उतरले जातील, असे सांगितले. त्याप्रमाणे अनधिकृत फलक उतरल्यानंतर तेथील दोन्ही समर्थक जमाव पांगले आणि तणावही निवळला. (प्रतिनिधी)
हलगर्जी : अनधिकृत फलकांवर कारवाई नाही
शहरामध्ये यापूर्वी शुभेच्छा फलक लावण्यावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. या प्रकारातून विक्रमनगरात खून झाल्याचा प्रकारही घडला आहे.
अनधिकृत डिजिटल फलकांच्या विरोधात नगरपालिकांनी तत्परतेने कडक कारवाई करावी, अशा आशयाचे आदेश उच्च न्यायालयाचे आहेत.
असे असतानाही इचलकरंजी नगरपालिकेकडून मात्र याबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.