पीएन-महाडिक यांच्यात तणातणी
By Admin | Updated: April 2, 2015 01:25 IST2015-04-02T01:24:19+5:302015-04-02T01:25:09+5:30
‘गोकुळ’चे रणांगण : पॅनेलमध्ये कितीजणांना घेणार..?

पीएन-महाडिक यांच्यात तणातणी
कोल्हापूर : भाजपला मिठ्ठी मारताय, ‘राष्ट्रवादी’शीही चर्चा सुरू आहे, मग तुम्ही सत्तारुढ पॅनेलमधून नक्की किती जणांना संधी देणार आहात ते तरी एकदा स्पष्ट सांगा, अशी विचारणा माजी आमदार पी. एन. पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांना बुधवारी सायंकाळी येथे केली. यावरून या दोघा नेत्यांत तणातणी झाल्याचे समजते परंतु बैठकीनंतर या दोघांनीही पॅनेलबाबत चर्चाच केली नसल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सत्तारूढ पॅनेलची रचना निश्चित करण्यासाठी बुधवारी सायंकाळी संघाच्या ताराबाई पार्कातील कार्यालयात सुमारे अर्धा तास या दोन नेत्यांत बंद खोलीत बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील व शिवाजी कवठेकर उपस्थित होते. बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आलीच शिवाय कार्यालयाचे मुख्य द्वार बंद करून आता कुणालाही सोडण्यात आले नाही. बैठकीनंतर हे दोन नेते एकत्रितच बाहेर आले. पत्रकारांनी त्यांना चर्चेबद्दल तपशील विचारला असता महाडिक यांनी पी. एन. यांच्याकडे बोट दाखवत तेथून काढता पाय घेतला.
पी. एन. पाटील म्हणाले,‘आजच्या बैठकीचे मुख्य कारण असे होते की, आमदार महाडिक यांचा मुलगा अमल हा भाजपचा आमदार आहे तरीसुद्धा त्याच पक्षाचे सहकारमंत्री आम्हाला सहकार्य करत नाहीत. याबद्दल नाराजी व्यक्त केली. काँग्रेसची सत्ता असताना आम्ही सांगेल ते सहकारमंत्री ऐकत होते. सांगेल त्या तारखेला सहकार संस्थाच्या निवडणुका त्यांनी लावल्या परंतु आताच्या सहकारमंत्र्यांचा व्यवहार तसा नाही, हे महाडिक यांच्या निदर्शनास आणून दिले.’
बैठकीत तुम्हा दोघांत जोरदार वाद झाल्याची चर्चा असल्याचे निदर्शनास आणून दिले असता पी. एन. म्हणाले,‘पॅनेलमधील जागांबाबत आजच्या बैठकीत काहीच चर्चा झालेली नाही. कोणतीही निवडणूक असो, माघारीच्या शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर करण्याची माझी पद्धत आहे तसेच ‘गोकुळ’मध्येही होईल. त्यामुळे वाद होण्याचे कारण नाही. आमच्यात वाद झाल्याच्या बातम्या वृत्तपत्रांनी दिल्यास उद्या आम्हाला खुलासे द्यावे लागतील.’ दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आमदार महाडिक हे जिल्'ांतील अनेक नेत्यांना पॅनेलमध्ये संधी देण्याबाबत आश्वासन देत आहेत. पॅनेलमध्ये अठराच जागा आहेत. तीन जागा वाढविण्याची सूचना पी. एन. यांनी केली होती परंतु त्यास महाडिक यांनी त्यावेळी प्रतिसाद दिला नाही. बाबासाहेब चौगले हे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या गटाचे असल्याने त्यांची एकच जागा रिक्त झाली आहे. दिवंगत नेते आनंदराव पाटील-चुयेकर व राजकुमार हत्तरकी यांच्या वारसांनाही पॅनेलमध्ये घेतले जाणार आहे. मग अदला-बदल करायला अथवा नव्याना संधी द्यायला जागाच नसताना महाडिक प्रत्येकाला आश्वासन देत सुटले आहेत. त्यामुळे त्यांना पॅनेलमध्ये संधी न दिल्यास कारण नसताना अडचणी वाढतील, असे पी. एन. यांचे म्हणणे होते व त्यांनी ते महाडिक यांच्या कानावर स्पष्टपणे घातल्याचे समजते, त्यावरूनच ही तणातणी झाली असल्याचे समजते.
अप्पींना उठवून बसविले..
महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वी अरुण नरके व विश्वास नारायण पाटील यांना गडहिंग्लजच्या दौऱ्यावर पाठविले होते. सदानंद हत्तरकी यांच्याबाबत ‘लोकमत’काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा दौरा होता. त्यांनी येताना अप्पी पाटील यांची भेट घेऊन चाचपणी केली. अप्पी पाटील हे भटक्या विमुक्त समाजातील आहेत. त्यांना निवडणूक लढविण्याबाबत विचारणा करण्यात आली, परंतु त्यांना सत्तारुढ आघाडीतून संधी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संध्यादेवी कुपेकर व आमदार हसन मुश्रीफ हे देखील नाराज होऊ शकतात. कारण गडहिंग्लजच्या राजकारणात अप्पी हे राष्ट्रवादीच्या विरोधात आहेत. मग त्यांना मुद्दाम जाऊन निवडणुकीबाबत विचारणा करण्याची गरज काय होती, अशी विचारणा महाडिक यांना केली असल्याचे समजते.
हलगी वाजवून दरोडा..
महाडिक आणि पी. एन. यांच्यात चोरून कधी काय नसते. आतापर्यंत जिल्'ांत आम्ही दोघांनी हलगी वाजवून दरोडे घातले आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत चोरून ठेवण्याजोगे काहीच झाले नसल्याचे आमदार महाडिक यांनी त्यांच्या नेहमीच्या ‘स्टाईल’मध्ये सांगितले.
बैठकीत काय झाले हे पी. एन. साहेबच तुम्हाला सांगतील. पी. एन. व मी एकच आहे. ते सांगतील ते महाडिक यांना मान्य असेल.
- आमदार महादेवराव महाडिक
सत्तारुढ आघाडीतील जागा वाटपाबाबत आजच्या बैठकीत कोणतीच चर्चा झालेली नाही. त्यासंदर्भात आम्ही ८ एप्रिललाच सकाळी घोषणा करू. - माजी आमदार पी. एन. पाटील.