मेघोली तलाव पुनर्बांधणीची जानेवारीपर्यंत निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST2021-09-18T04:25:51+5:302021-09-18T04:25:51+5:30
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. धरण कशाने फुटले याचा ...

मेघोली तलाव पुनर्बांधणीची जानेवारीपर्यंत निविदा
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. धरण कशाने फुटले याचा अभ्यास पाटबंधारे विभागातील तज्ज्ञाची समिती करीत आहे. त्यांचा निष्कर्ष येण्यास दोन ते तीन महिने लागतील. तोपर्यंत तलावाची पुनर्बांधणी करण्यासाठीची जानेवारीपर्यंत निविदा निघेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी दिले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेतली.
भेटीवेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी रेखावार बोलत होते. ते म्हणाले, मेघोली तलाव फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मी स्वत: जाऊन पाहणी करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून वाहून गेलेल्या विहिरीची खोदाई करता येईल. यासाठी प्रशासन मदत करेल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज भरण्यास मुदत दिली जाईल.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, तलाव फुटण्यास कोण जबाबदार याची चौकशी झाली पाहिजे, दोषींवर जबाबदारी निश्चित करावी. तलावफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. शिवाय सरकारकडून त्यांना भरीव मदत मिळायला हवी. तलावाची पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करावा.
या वेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, अतुल गुरव, कुंडलिक देसाई, शिवाजी पाटील, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.
चौकट
तलाव दिवसा फुटला असता तर
मेघोली तलावाच्या खालील बाजूस शेतीच्या मशागतीसाठी अनेक शेतकरी असत. दिवसा तलाव फुटला असता तर मशागतीचे काम करणारे शेतकरी, मजूर असे शंभरावर लोक वाहून गेले असते. पाटबंधारे विभागाने गळतीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना झाल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.