शेतमजूर पळून गेल्याने दहा ते बारा लाख रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:41 IST2021-02-18T04:41:50+5:302021-02-18T04:41:50+5:30
वारणा नदी काठावर असलेल्या किणी गावास शेतीचे बागयती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जास्त क्षेत्र ...

शेतमजूर पळून गेल्याने दहा ते बारा लाख रुपयांचा फटका
वारणा नदी काठावर असलेल्या किणी गावास शेतीचे बागयती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या कामासाठी वर्षाच्या परागावर ठरवून शेतमजूर काम करतात. त्याच प्रमाणे सात ते आठ महिन्यांपूर्वी कर्नाटक राज्यातील एक मजूर वर्षभराचे पैसे अगोदरच घेऊन शेतीच्या कामासाठी आला होता. या कालावधीत हळूहळू शेतकऱ्याचा विश्वास संपादन करून अकरा मजूर किणी येथील शेतकऱ्यांंकडे शेतीच्या कामासाठी आले होते. यामध्ये निम्याहून अधिक गेल्या काही दिवसांपूर्वीच आले होते, तर यांना पगारापोटी वर्षाला सत्तर हजार रुपये ठरवून काहींना एक तर काहींना दोन वर्षांचे आगाऊ पैसे देण्यात आले होते. सर्वांची मिळून दहा ते बारा लाख रुपये इतकी रक्कम होते. हे अकरा मजकूर एकाचवेळी ठरवून कर्नाटक राज्यात निघून गेले आहेत. शेतकऱ्यांनी याचा शोध घेत त्यांच्या गावात जाऊन आले. मात्र, त्यांचा थांगपत्ता लागत नाही. यामध्ये काही मजुरांनी खोटी माहिती व नावे दिल्याचे चौकशीत आढळून आले आहे. शेतामध्ये कामास माणूसही नाही व दिलेले पैसेही बुडाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. एकाचवेळी अकरा मजूर पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, लाखो रुपयांचा फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.