दहा हजार विद्यार्थी सोमवारी रस्त्यावर
By Admin | Updated: February 26, 2015 00:47 IST2015-02-26T00:42:35+5:302015-02-26T00:47:51+5:30
‘शैक्षणिक व्यासपीठ’तर्फे आयोजन

दहा हजार विद्यार्थी सोमवारी रस्त्यावर
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना लवकर शोधून फाशी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी (दि. २) शहरातील सर्व शाळांमधील दहा हजार विद्यार्थ्यांच्या मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. गांधी मैदानातून सकाळी साडेआठ वाजता हा मोर्चा निघेल.
पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना लवकर शोधावे व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी सोमवारी (दि. २) ‘शैक्षणिक व्यासपीठ’तर्फे मोर्चाचे आयोजन केले आहे. दाभोलकर व पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध न लागल्यास सरकारने राजीनामा द्यावा; तसेच अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेच्या विरोधातील खोटा इतिहास काढून टाकावा. दाभोलकर व पानसरे यांच्या खुनांत ज्या संघटनांचा सहभाग आहे, त्यांच्यावर कायमची बंदी घालावी, पानसरे यांचे स्मारक बनवावे; त्यामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, इतिहास संशोधन केंद्र यांचा समावेश असावा, अशा मागण्या यावेळी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येणार आहेत.
सकाळी साडेआठ वाजता निघून महाद्वार रोड-पापाची तिकटी- महापालिका-बिंदू चौक येथे येऊन जिल्हा प्रशासनाला तिथे बोलावून मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या एक लाख प्रतींचे वाटप होईल.
पालकांनीही
सहभागी व्हावे..
या मोर्चात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व पालकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनीच त्याबाबत आपपल्या आईवडिलांना मोर्चास येण्यासंदर्भात विनंती करण्याची सूचना करण्यात आली आहे.