दहा वाळू वाहतूक परवाने रद्द
By Admin | Updated: July 5, 2015 00:51 IST2015-07-05T00:51:30+5:302015-07-05T00:51:30+5:30
अवैध वाहतूक : तहसीलदारांकडून ‘आरटीओं’ना सूचना

दहा वाळू वाहतूक परवाने रद्द
कोल्हापूर : अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करून दंड न भरणाऱ्या दहाजणांचे वाहतूकपरवाने रद्द करण्याची सूचना, करवीरचे तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे यांनी शनिवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) लक्ष्मण दराडे यांना केली. यावर लवकरच कार्यवाही होऊन परवाने रद्द होण्याची शक्यता आहे.
अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात शुक्रवारी करवीर तहसीलदार कार्यालयाने धडक कारवाई केली. कळंबा, सरनोबतवाडी, कुडित्रे या ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारे नऊ ट्रक, मुरूम वाहतूक करणारा एक ट्रक व चार ट्रॅक्टर-ट्रॉली पकडण्यात आल्या. यातील दोघांनी प्रत्येकी ३० हजार रुपये दंडाची रक्कम भरल्याने त्यांच्यावर पुढील कारवाई होणार नाही. परंतु, दहाजणांनी ही रक्कम न भरल्याने त्यांचे वाहन परवानेच रद्द करावेत, अशी लेखी सूचना तहसीलदार डॉ. खरमाटे यांनी ‘आरटीओ’ दराडे यांंना केली आहे. सचिन वैजनाथ वावळे (रा. हेर्ले, ता. हातकणंगले), तानाजी भीमा शिंदे (रा. जक्राटी, अथणी, जि. बेळगाव), संजयसिंग राजपूत (रा. कऱ्हाड, जि. सातारा), विश्वनाथ सूर्यवंशी (रा. कऱ्हाड, जि. सातारा), बशीर मौला शेख (रा. टेंबलाईवाडी, कोल्हापूर), प्रशांत देसाई (रा. फुलेवाडी, कोल्हापूर), राजू कोळी (रा. टोप, ता. हातकणंगले), भीमराव धोंडी पाटील (रा. वाकरे, ता. करवीर), पांडुरंग परशराम तोडकर (रा. बालिंगा, ता. करवीर), संजय शामराव चौगले (रा. वाकरे, ता. करवीर)अशी वाहनचालक व मालकांची नावे आहेत.
या वाहनधारकांना अनधिकृतपणे वाळू वाहतूक करीत असताना मंडल अधिकाऱ्यांनी पकडले. त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये ही वाहने जप्त करण्यात यावीत. तसेच त्यांचा वाहतूक परवाना रद्द करण्याची व नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, असे तहसीलदारांनी ‘आरटीओं’ना केलेल्या लेखी सूचनेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)