फेरीवाल्यांचे तात्पुरते पुनर्वसन

By Admin | Updated: November 21, 2014 00:34 IST2014-11-21T00:11:04+5:302014-11-21T00:34:58+5:30

इचलकरंजीत पालिकेची कारवाई : पर्यायी जागा देण्याची संघटनेची मागणी

Temporary rehabilitation of hawkers | फेरीवाल्यांचे तात्पुरते पुनर्वसन

फेरीवाल्यांचे तात्पुरते पुनर्वसन

इचलकरंजी : मुख्य रस्त्यावरील कपडे विक्री करणारे फेरीवाले यांचे रजिस्टर आॅफिससमोरून तात्पुरते पुनर्वसन प्रांत कार्यालय ते शिवाजी पुतळा चौक या फिल्टर हाऊसलगतच्या रस्त्याकडेला करण्यात आले. आज, गुरुवारी वाहतूक शाखेचे पोलीस सोबत घेऊन अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी ही कारवाई केली. यावेळी या मार्गावर गाड्या लावणाऱ्या मोटार मालकांनी विरोध केला. मात्र, विरोध धुडकावून लावत पोतदार यांनी फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले.
जयहिंद मंडळाच्या जागेत हे फेरीवाले भाडेपट्टीवर आपले एक खाटचे स्टॉल लावून व्यवसाय करीत होते. त्यानंतर जयहिंद मंडळाने क्रीडांगण वाढविल्यामुळे हे फेरीवाले व्यवसायाकरिता फुटपाथवर आले. त्यामुळे फुटपाथवर अतिक्रमण होऊन रहदारीस अडथळा निर्माण झाला होता.
याबाबत नगरपालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यामुळे पालिकेने कारवाई करत त्यांची दुकाने बंद केली. पर्यायी तात्पुरती व्यवस्था म्हणून रजिस्टर आॅफिसच्या समोरील बाजूस काही दुकानांची व्यवस्था करण्यात आली. मात्र, सर्व फेरीवाले त्याठिकाणी बसू शकत नसल्यामुळे एका फेरीवाल्याला दोन दिवसांतून एकदा दुकान लावण्यासाठी नंबर मिळू लागला. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला. याबाबत फेरीवाले संघटनेने अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करून फेरीवाले कायद्यानुसार आम्हाला पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन आमच्याकडून रितसर नगरपालिकेचे भाडे आकारावे, अशी मागणी केली.
आज अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांना सोबत घेऊन प्रांत कार्यालय ते शिवाजी पुतळा चौक परिसरात मोटार गाड्या पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांना तेथून मोटारी काढायला लावल्या. यावेळी मोटार चालक-मालक संघटनेनेही विरोध केल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोतदार यांनी नगरपालिकेच्यावतीने फेरीवाले धोरणानुसार जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असून, त्याप्रमाणे ही कार्यवाही करण्यात आली असल्याने तुम्हालाही या परिसरात पे अ‍ॅण्ड पार्क पद्धतीने पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन दिले.
पालिकेच्या या धोरणाला काही वाहनधारकांनी विरोध केला. मात्र, पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू ठेवून फेरीवाल्यांचे या मार्गावर पुनर्वसन केले. या फेरीवाल्यांकडून हे तात्पुरते पुनर्वसन असल्याचे व आपल्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची निर्गत आणि नियमित भाडे देणे याबाबत पालिका व फेरीवाले यांच्यात करारही करण्यात आला. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

भाडे करार
कापड विक्री फेरीवाल्यांकडून हे पुनर्वसन तात्पुरते असल्याचे व आपल्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची निर्गत आणि नियमित भाडे देणे याबाबत यावेळी नगरपालिका व फेरीवाले संघटना यांच्यात करार झाला. दरम्यान, आम्हाला फेरीवाले कायद्यानुसार पर्यायी जागा द्या आणि रितसर भाडे आकारा, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

Web Title: Temporary rehabilitation of hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.