टेम्पोची जीपला धडक, वृध्दा ठार
By Admin | Updated: July 18, 2014 00:57 IST2014-07-18T00:54:18+5:302014-07-18T00:57:16+5:30
कळंब्याजवळ अपघात : १६ प्रवासी गंभीर

टेम्पोची जीपला धडक, वृध्दा ठार
कोल्हापूर/कळंबा : कोल्हापूर-गारगोटी महामार्गावर कत्यायणी पेट्रोल पंपासमोरील नागमोडी वळणावर भरधाव आयशर टेम्पो आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅक्सची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक वृद्धा ठार, तर १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. अनुसया शामराव कांबळे (वय ७०, रा. दोनवडे, ता. भुदरगड) असे मृत वृद्धेचे नाव असून, हा अपघात आज, गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास झाला.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रवासी वाहतूक करणारी टॅम्पो ट्रॅक्स गारगोटीहून कोल्हापूरकडे येत होती, तर कोल्हापूरहून गारगोटीकडे भरधाव आयशर टेम्पो जात होता. ही दोन्ही वाहने कात्यायनी पेट्रोल पंपासमोर आली असता त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी जोराची होती की, वडाप वाहतूक करणारी ट्रॅक्स रस्त्यापासून १५ फूट अंतरावर फेकली गेली. गाडीमध्ये सुमारे १७ प्रवासी होते. ते सगळे अस्ताव्यस्तपणे फेकले गेले. कुणाच्या डोक्याला, हाता-पायाला, तोंडाला गंभीर जखम झाल्याने त्यांचे कपडे रक्ताने माखले होते. मदतीसाठी जखमी आरडाओरड करीत होते. हे दृष्य पाहून भेदरलेल्या प्रवाशांना इतर वाहनधारकांनी धीर देत मिळेल त्या वाहनातून त्यांना तातडीने सीपीआरमध्ये उपचारासाठी पाठविले.
याठिकाणी अनुसया कांबळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर जखमींवर तातडीने उपचार करण्यात आले. काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताची माहिती समजताच जखमींच्या नातेवाइकांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. कोणाला किती लागले, आपली व्यक्ती दिसत नाही तोपर्यंत नातेवाइकांच्या जिवात जीव नव्हता. प्रत्येकजण जवळच्या नातेवाइकाला आमची आक्का, ताई, आजी, आई, तात्या, चांगले आहेत का, अशी विचारणा करीत होता. अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी सीपीआरमध्ये येऊन जखमींची विचारपूस केली, तर करवीरचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी अपघातस्थळी भेट दिली. या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.
जखमींची नावे अशी, अभिजित वसंतराव देसाई (वय ३०), सुरज जयसिंग कांबळे (१९), सुरेश महादेव रावळ (३६, रा. गारगोटी), लक्ष्मण बाबूराव कुंभार (३५), सुभाष शांतिनाथ कुंभार (३०), दिलीप बाबूराव कुंभार (२३, सर्व रा. शेणगांव, ता. भुदरगड), गौराबाई दत्ताजी कांबळे (४०), सुनील दत्तात्रय कांबळे (१८, दोघे रा. दोनवडे, ता. भुदरगड), धनाजी बंडोपंत कांबळे (३१), सागर बाबूराव कांबळे (३१), सुनील केशव कांबळे (४१, सर्व रा. निगवे खालसा, ता. करवीर), सरदार रामचंद्र मोरे (२२, रा. कोनवडे), साताप्पा श्रीपती फराकटे (४५, रा. दिंडेवाडी), मोहन वसंत पाटील (२४, रा. गडबिद्री), मोहन बाबासाहेब देसाई (४९, रा. पुष्पनगर, ता. भुदरगड), दिलीप दिनकर पोवार (२९, रा. असंडोली).