टेम्पो उलटून १४ विद्यार्थी जखमी
By Admin | Updated: November 21, 2014 00:54 IST2014-11-21T00:50:06+5:302014-11-21T00:54:10+5:30
सहाजण गंभीर : विद्यार्थी दोडामार्ग तालुक्यातील; गोवा साखळीत दुर्घटना

टेम्पो उलटून १४ विद्यार्थी जखमी
दोडामार्ग/ होंडा (ता. सत्तरी-गोवा) : आयी (ता. दोडामार्ग) येथील नवदुर्गा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वनभोजनासाठी हरवळे गोवा येथे घेऊन जाणारा मिनी टेम्पो उलटल्याने झालेल्या अपघातात चौदा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यापैकी आठ विद्यार्थ्यांवर साखळी येथे, तर गंभीर असलेल्या सहाजणांवर गोवा बांबोळी येथील जीएमसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज, गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास साखळी रवींद्र भवनानजीक घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, प्रशालेच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवास सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, टेम्पोचालक उमेश तळकटकर याला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आयी येथील नवदुर्गा माध्यमिक विद्यालयाने आज हरवळे गोवा येथे वनभोजनासाठी जाण्याचा बेत आखला. सकाळी नऊच्या सुमारास प्रशालेतील तीस विद्यार्थी व तीस विद्यार्थिनी वनभोजनास जाण्यास निघाले. त्यासाठी दोन मिनी टेम्पो ठरविण्यात आले. एका टेम्पोत मुले, तर दुसऱ्यात मुली असा प्रवास सुरू झाला. साखळी गोवा येथील रवींद्र भवनामध्ये क्रांतिकारी लोकांवर आयोजित प्रदर्शनाला भेट देऊन वनभोजनासाठी जाण्याचे प्रयोजन आखण्यात आले होते. मात्र, धाटवाडा-पर्ये येथील व्यवस्थापन महाविद्यालयाजवळ पोहोचताच उतरणीवर असलेल्या एका वळणावर एका टेम्पोचालकाचा ताबा सुटला. टेम्पो तिथेच उलटला आणि अंदाजे पाच मीटर घसरत जाऊन रस्त्याकडेने बसवलेल्या पोलादी सुरक्षा कुंपणाला धडकला. टेम्पोत विद्यार्थी होते, तसेच शिक्षक आपल्या मुलीला घेऊन चालकासोबत केबिनमध्ये बसले होते. अपघात घडताच विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. उपस्थित नागरिकांनी टेम्पो बाजूला करत विद्यार्थ्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
संख्येबाबत संभ्रम
अपघात घडलेल्या माल
वाहतूक मिनी टेम्पोमध्ये शिक्षकवर्गाने खचाखच विद्यार्थी भरले होते, असे काही विद्यार्थ्यांकडून समजते. मात्र, त्या टेम्पोत फक्त २० विद्यार्थी होते, असे उज्ज्वला पर्येकर या शिक्षिका सांगत होत्या; पण प्रत्यक्ष आरोग्य केंद्रात २२ जणांवर उपचार केले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विद्यार्थ्यांना अशाप्रकारे भरून आणल्याने पालकांत संताप व नाराजी व्यक्त करण्यात येत होती.