तापमान वाढत आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:48 IST2019-04-04T23:48:37+5:302019-04-04T23:48:43+5:30
डॉ. व्ही. एन. शिंदे ‘उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र तापला; चंद्रपूर ४३.४’ आणि ‘यंदाचा उन्हाळा असणार कडक’ या बातम्या या वर्षीही ...

तापमान वाढत आहे
डॉ. व्ही. एन. शिंदे
‘उष्णतेच्या लाटेने महाराष्ट्र तापला; चंद्रपूर ४३.४’ आणि ‘यंदाचा उन्हाळा असणार कडक’ या बातम्या या वर्षीही आल्या. या बातम्या आल्या नाहीत असे वर्ष मला तरी आठवत नाही. दरवर्षी या बातम्या येतच आहेत. आपण त्या वाचतच आहोत. यावर्षी तर एप्रिल सुरू होतानाच साडेत्रेचाळीस सेल्सिअस अंश तापमानाकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सलग तीन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहील असा अंदाज आहे. एप्रिल ते जून या कालावधीत सरासरीपेक्षा ०.५ अंश तापमान जास्त राहील, असाही अंदाज आहे; तर राजस्थानात ते सरासरीपेक्षा एक अंश जास्त असेल. भारताच्या बहुतांश भागांत असेच वातावरण असेल. हा उन्हाळा किती जीव घेणार, हे काळच ठरवील. लोकांनी यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. उन्हात फिरणे टाळण्यासह आपण अनेक बंधने घालून घेतली पाहिजेत. ही तात्पुरती उपाययोजना करावीच लागेल.
दुसरीकडे उन्हाळा कडक व्हायला लागला की, आपण एअर कंडिशनरसारख्या आणखी भौतिक सुख देणाऱ्या सुविधा आपल्याशा करतो. महागाई कितीही असो, सुखाच्या गोष्टी घेतोच. आपल्या क्षणिक सुखासाठी आपण वातावरणाची किती हानी करीत आहोत, हे आपण उन्हाळा येताच लक्षात घेतो आणि पावसाळा आला की पावसाच्या सरीबरोबर ते लक्षात आलेले सगळे वाहून जाऊ देतो. पावसाळा आला की, झाडे लावण्याचा ऋतू येतो. मोठ्या उत्साहात वृक्षलागवड होते. मोकळ्या जागा शोधल्या जातात. झाडे लावली जातात. तो एक उत्सव बनतो. मुळात हे तापमान का वाढत आहे? याचे उत्तर आपण अनेक वेळा ऐकतो, झाडे कमी झाली. प्रश्नच नाही, हे एक महत्त्वाचे कारण आहे. मात्र, केवळ ते कारण नाही, तर तो तापमानवाढीस आळा घालण्याचा उपाय आहे. वातावरणात फक्त वृक्ष असे आहेत की जे कार्बनडाय आॅक्साईड घेतात आणि आॅक्सिजन वातावरणात सोडतात. हा वायू पृथ्वीवर आलेले विशिष्ट तरंग लांबीचे सूर्यकिरण शोषतो. त्यामुळे पृथ्वीवरील वातावरण उबदार राहते. त्यामुळेच पृथ्वीवर जैवविविधता वाढली. तसा हा कार्बनडाय आॅक्साईड तयार झालाच नसता, त्याने सूर्यकिरणे शोषून वातावरण उबदार ठेवले नसते; तर जीवसृष्टी एवढी वाढली नसती, असे संशोधक सांगतात.
मात्र, वातावरणात कार्बनडाय आॅक्साईड वाढत चालला आहे. आम्ही तो वाढवित आहोत. त्याला शोषून संतुलन करणारी झाडे आम्ही संपवित चाललो आहोत. त्यामुळे त्याचे आणखी प्रमाण वाढत चालले आहे. या संदर्भात ग्रीन हाऊस परिणामाचीही वारंवार चर्चा होते. १५० वर्षांपूर्वी पृथ्वीवर कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण हे २८० कण प्रती दशलक्ष कण (पीपीएम) इतके होते. आज हे प्रमाण चारशे कण इतके वाढले आहे. त्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत. पावसाचे प्रमाण आणि नियमितता बिघडली आहे. तापमान वाढत आहे. वादळे वाढत आहेत. हे सर्व दुष्परिणाम पृथ्वीला सहन करावे लागत आहेत.
वाढत जाणारी वाहनांची संख्या, वाढते वणवे, औद्योगिक क्षेत्रातील इंधनाचा वाढता वापर हे सर्व वातावरणाला हानिकारक घटक वातावरणात सोडतात. हे प्रमाण आपण वाढविले आपल्या सुखासाठी. मात्र, त्यांना संतुलित ठेवण्याच्या उपाययोजनेचा तितक्याशा गांभीर्याने आपण विचार करीतच नाही. वाढत्या सुखासाठी वापरली जाणारी उपकरणे, त्यांना लागणारी ऊर्जानिर्मिती, ऊर्जानिर्मितीसाठी वापरले जाणारे इंधन, त्या इंधनातून बाहेर पडणारा कार्बनडाय आॅक्साईड ही साखळी येथे खंडित होते. ती पूर्ण करायची तर हा वाढता कार्बनडाय आॅक्साईड शोषणाऱ्या एकमेव घटकाचे, वृक्षांचे प्रमाण वाढविलेच पाहिजे. निसर्ग संतुलित राहिलाच पाहिजे. त्यासाठी वृक्ष लावणे ते जगविणे आवश्यक आहे. हे केले नाही तर ही सुंदर वसुंधरा आपण नष्ट करणार आहोत आणि तिचे मारेकरी असू आपण!
(लेखक विज्ञान व तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत.)