सांगा, आम्ही जगायचं तरी कसं !
By Admin | Updated: October 5, 2016 00:39 IST2016-10-05T00:06:21+5:302016-10-05T00:39:31+5:30
उपचारासाठी डोलीतून प्रवास : पाठारचा धनगरवाडा मूलभूत सुविधांपासून वंचित

सांगा, आम्ही जगायचं तरी कसं !
राजाराम कांबळे--मलकापूर -शाहूवाडी तालुक्यातील येळवणजुगाईपैकी पाठारचा धनगरवाडा येथे स्वातंत्र्याच्या सत्तरीतही कोणत्याच मूलभूत सुविधा पाहोचलेल्या नाहीत. अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच रस्ते, वाहतुकीच्या सुविधा पोहोचल्या नसल्याने रुग्णाला उपचारासाठी डोलीतून न्यावे लागत आहे. सांगा आम्ही जगायचे कसं? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारत आहेत.
शाहूवाडी तालुका १४१ गावे व २५० वाड्यावस्त्यांतून विभागला आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर येळवणजुगाई पैकी पाठारचा धनगरवाडा डोंगरकपारीत वसला आहे. या वाड्यावर सुमारे पंचवीस कुटुंबे राहत आहेत. आजपर्यंत त्यांना शासनाच्या मूलभूत सुविधांचा लाभ झालेला नाही. वाड्यावर जायला रस्ता नाही, जंगलातून नागरिकांना व शाळकरी मुलांना प्रवास करावा लागतो. मुलांना शिक्षणासाठी पाच किलोमीटर अंतरावर येळवणजुगाई येथे जावे लागते. गेले चार महिने वाड्यावर लाईट नाही. पाणी योजना असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था आहे. ओढ्याच्या दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. लाईट नसल्यामुळे शालेय मुलांना रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करावा लागतो.
पाचवीपर्यंत शाळा असूनदेखील शासनाच्या दुर्लक्षामुळे ती बंद पडली आहे. नागरिकांना उपचारासाठी डोलीतून दहा किलोमीटर मांजरे दवाखान्यात न्यावे लागते. उपचाराअभावी येथील चार ते पाच माणसे दगावली आहेत. पाणी नसल्यामुळे शेती करता येत नाही, रोजगाराच्या संधी नाहीत. तरुणांना मुंबई, पुणे येथे पोटाची खळगी भरण्यासाठी जावे लागते.
नागरिक जंगलातील औषधी वनस्पती, करवंदे, आळू, जांभूळ, आदी रानमेवा विकून आपली गुजराण करीत आहेत. पावसाळ्यात लागण केलेली भातशेती जंगली प्राणी फस्त करीत आहेत. निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडण्यासाठी नेतेमंडळी भेट देतात. अठरा विश्वे दारिद्र्य घेऊन आम्ही जन्माला आलो ही आमची चूक आहे का? आम्हाला नाहीतर आमच्या मुलाबाळांना तरी शासनाने मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे. पाठारचा धनगरवाडा, माणेचा धनगरवाडा, मालाईचा धनगरवाडा या तीन धनगरवाड्यांवर अशी अवस्था आहे.
शासनाने आमची दखल घेतली नाही, तर येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकणार.
- राया विठू कस्तुरे