दूरशिक्षणचे विद्यार्थी परीक्षेपासूनही ‘दूर’
By Admin | Updated: May 12, 2015 00:16 IST2015-05-12T00:13:40+5:302015-05-12T00:16:02+5:30
विद्यापीठाचा कारभार : प्रश्नपत्रिकाच बनविली नाही

दूरशिक्षणचे विद्यार्थी परीक्षेपासूनही ‘दूर’
कोल्हापूर : वर्षभरापूर्वी विषय निवडला. त्यानुसार अर्ज भरला. परीक्षेचे प्रवेशपत्र देखील मिळाले. मात्र, प्रत्यक्षात परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर प्रश्नपत्रिका बनविली नसल्याने पेपर होणार नसल्याचे समजताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. शिवाजी विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा सोमवारी दूरशिक्षण विभागातील एम.ए.च्या द्वितीय वर्षांतील समाजशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना फटका बसला.
समाजशास्त्र शाखेतील सत्र चारची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. पहिला पेपर ‘एनव्हायरर्नमेंट अँड सोसायटी इन इंडिया’हा दुपारी तीन ते सायंकाळी सहा यावेळेत होणार होता. त्यासाठी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास विद्यार्थी विद्यापीठाने दिलेल्या परीक्षा केंद्रावर पोहोचले. यात दूरशिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. वीस गुणांचे प्रात्यक्षिक असल्याने नियमित विद्यार्थ्यांनाच हा ८० गुणांचा पेपर देता येणार होता. पण, नियमित विद्यार्थी नसल्याने प्रश्नपत्रिकाच बनविली नव्हती. शहरातील केएमसी कॉलेज केंद्रावर बैठक व्यवस्था असलेल्या २० हून अधिक दूरशिक्षणच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका बनविली नसल्याने तुमची परीक्षा घेण्यात येऊ नये, असा विद्यापीठाचा निरोप असल्याचे पर्यवेक्षकांनी सांगितले. तसेच अधिक माहितीसाठी विद्यापीठात जाण्याचा सल्ला दिला. त्यावर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अशीच अवस्था कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील केंद्रांवरील अन्य विद्यार्थ्यांची झाली. त्यावर काही विद्यार्थी दूरशिक्षण विभागात पोहोचले. याठिकाणी त्यांना परीक्षा भवनात जाण्यास सांगितले. परीक्षा भवनात संबंधित विद्यार्थ्यांनी प्रभारी परीक्षा नियंत्रक जी. आर. पळसे यांची भेट घेऊन झालेला प्रकार सांगितला. तसेच आमचे हे अंतिम वर्ष असल्याने पेपर घ्यावा, अशी विनंती केली. पेपर घेण्याचे मान्य केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)
आमचा दोष काय?
विषयाबाबतची तांत्रिक अडचण यापूर्वीच परीक्षा विभागाच्या लक्षात येणे आवश्यक होते. त्यानुसार विषय बदलावा, अशी सूचना प्रत्यक्षात अथवा एसएमएसद्वारे देणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. वर्षभर अभ्यास करून केंद्रावर गेल्यावर पेपर होणार नाही, हे विद्यापीठाकडून सांगणे चुकीचे आहे. त्यांच्या चुकीत आमचा दोष काय? असा सवाल विद्यार्थ्यांनी केला.
रविवारी होणार पेपर...
नियमित विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्याने संबंधित पेपरसाठी नोंदणी केली नव्हती. त्यामुळे या विषयाचा पेपर सेटिंग करण्यात आला नाही. मात्र, दूरशिक्षणाच्या विद्यार्थ्यांनी नेट कॅफेवरून अर्ज भरल्यामुळे त्यांनी प्रात्यक्षिक असलेल्या या विषयाची निवड केल्याचे सोमवारी लक्षात आले. त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे प्रभारी परीक्षा नियंत्रक जी. आर. पळसे यांनी सांगितले.