एसटीत युवतीची छेड, सेवानिवृत्त व्यक्तीस चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:27 IST2021-01-16T04:27:07+5:302021-01-16T04:27:07+5:30
इचलकरंजी : कोल्हापूर येथील एका सहकारी संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या वृद्धाने कोल्हापूर-इचलकरंजी एसटीमध्ये प्रवासादरम्यान युवतीची छेड काढली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी ...

एसटीत युवतीची छेड, सेवानिवृत्त व्यक्तीस चोप
इचलकरंजी : कोल्हापूर येथील एका सहकारी संस्थेतून सेवानिवृत्त झालेल्या वृद्धाने कोल्हापूर-इचलकरंजी एसटीमध्ये प्रवासादरम्यान युवतीची छेड काढली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली केले. याबाबत युवतीने तक्रार न दिल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल झाला नाही. राधानगरी तालुक्यातील असलेला व सध्या कळंबा परिसरात राहणारा हा ६३ वर्षीय वृद्ध व्यक्ती कोल्हापुरातून इचलकरंजीला एका नातेवाइकाकडे एसटीतून येत होता. प्रवासादरम्यान साजणी (ता.हातकणंगले)पर्यंत एसटी आल्यानंतर त्याने त्याच्याशेजारी बसलेल्या युवतीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. छेडछाड वाढल्याने युवतीने आरडाओरडा करत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे बसमधील अन्य प्रवाशांनीही त्याला चांगलाच चोप दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रवाशांनी त्याला इचलकरंजी बसस्थानकाजवळ असलेल्या वाहतूक शाखेतील पोलिसांच्या स्वाधीन केले. तेथून शिवाजीनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आयजीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून त्याला ताब्यात घेतले होते. परंतु युवतीची तक्रार नसल्याचे कारण सांगून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.
चौकट
राजकीय व्यक्तींची गर्दी
संबंधित छेड काढणारा वृद्ध हा एका मोठ्या राजकीय नेत्याच्या सहकारी संस्थेत काम करीत होता. तेथून सेवानिवृत्त झाला असला तरी त्याचे मोठे नेटवर्क असल्याने त्याने काही राजकीय व्यक्तींना फोन करून बोलावून घेतले होते. त्यामुळे पोलीस ठाण्यात राजकीय व्यक्तींची गर्दी झाली होती.