महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला
By Admin | Updated: February 22, 2015 01:05 IST2015-02-22T00:53:58+5:302015-02-22T01:05:36+5:30
मुली, सून, नातवंडे नि:शब्द... दसरा चौकात कष्टकरी महिलांना आठवणींचा गहिवर

महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला
कोल्हापूर : माझ्या बाबांनी कुणाचे काय वाईट केले होते?..अशी दु:खद प्रतिक्रिया देणारी कन्या मेघा पानसरे-टिक्के, स्मिता सातपुते, सून मेघा पानसरे, नातवंडे कबीर आणि मल्हार यांच्या अश्रूंचा बांध फुटत होता...हजारो लोक धीर देत होते, सांत्वन करत होते पण पानसरे कुटुंबीय नि:शब्द होते... ज्या कष्टकरी महिलांच्या कामाला पुरेसा मोबदला मिळावा म्हणून अण्णा लढले त्यांनी ‘आमचा बाप गेला,’ असा टाहो फोडला.
दसरा चौकातील मैदानावर अण्णांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी कष्टकरी महिलांची प्रचंड गर्दी होती. दुपारी पार्थिव दसरा चौकात आणले. व्यासपीठावर कार्यकर्त्यांनी शवपेटी उघडताच अण्णांच्या मुली, सून आणि नातवंडांनी हंबरडा फोडला. कबीर तर तेथून उठायलाही तयार नव्हता. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला स्मिता आणि मेघा पानसरे बसल्या होत्या. येणारे आप्तेष्ट आणि नातेवाईक सांत्वन करत होते. या दोघी मात्र नि:शब्द... कबीर आणि मल्हार दोघेही रडत उभे आणि जवळचे कार्यकर्ते त्यांना सावरायचा प्रयत्न करत होते.
अण्णांनी ज्या कष्टकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा म्हणून आयुष्यभर लढा दिला. त्या महिलांना अण्णांच्या आठवणींचा गहिवर दाटून आला. गावोगावाहून आलेल्या तंबाखूविरोधी संघटनेच्या महिला म्हणाल्या, अण्णा आम्हाला नेहमी म्हणायचे. तुम्ही लढा, कुठे अडचणी वाटल्या, साथ मिळत नाही, असे जाणवले तर माझ्याशी बोला.’ आता अण्णा गेले आम्ही कुणाशी बोलायचं.