महामार्गाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय तज्ज्ञ पथक येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:04+5:302021-09-13T04:23:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुणे-बंगलोर व नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील पूल व भरावामुळे कोल्हापूर, सांगली व बेळगावच्या सीमाभागात यंदा महापुराने ...

महामार्गाचा अभ्यास करण्यासाठी केंद्रीय तज्ज्ञ पथक येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुणे-बंगलोर व नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील पूल व भरावामुळे कोल्हापूर, सांगली व बेळगावच्या सीमाभागात यंदा महापुराने मोठी हानी झाली. याचा अभ्यास करण्यासाठी पंधरा दिवसांत केंद्राय तज्ज्ञ पथक पाठवून दिले जाईल, असे आश्वासन केंद्रीय वहातूकमंत्री नितीन गडकरी यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना दिले.
कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी या नद्यांवर जे पूल बांधलेले आहेत. त्या अनेक पुलांच्या दोन्ही बाजूस दोन-दोन किलोमीटर भराव आहे. महापूर काळामध्ये नद्या पात्रापासून दोन - दोन किलोमीटर पाणी पसरते अशा काळात हे पूल बंधाऱ्याचे काम करतात. म्हणून नदीतील पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते. राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन -दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहित होईल.
सध्या रत्नागिरी -नागपूर या नवीन महामार्गाच्या आंबा घाट ते मिरज शहर बायपास रोड या मार्गावरही अनेक ठिकाणी नवीन पूल बांधकाम व भराव टाकण्याचे काम सुरू असून या कामातही पाणी प्रवाहित होण्यासाठी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुलाचा व रस्त्याचा भराव कमी करून कमानी वाढविणे गरजेचे असल्याचे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले.
जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सावकर मादनाईक, अमित पाटील, सागर मादनाईक, हर्षद इंगळे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी :
पुणे-बंगलोर व नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील पुलांचा भराव काढून तिथे कमानी बांधाव्यात, या मागणीचे निवेदन राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले. यावेळी सावकर मादनाईक उपस्थित होते. (फोटो-१२०९२०२१-कोल- स्वाभिमानी)