मनपा शाळेस शिक्षकांनी पाच दिवसांचा पगार द्यावा

By Admin | Updated: September 8, 2014 00:12 IST2014-09-08T00:11:35+5:302014-09-08T00:12:45+5:30

सतेज पाटील यांनी आवाहन : आपले आमदार व मंत्रीपदाचे एक महिन्यांचे मानधन देण्याची घोषणा; शिक्षक पुरस्कार वितरण

Teachers should pay a five-day salary to the Municipal school | मनपा शाळेस शिक्षकांनी पाच दिवसांचा पगार द्यावा

मनपा शाळेस शिक्षकांनी पाच दिवसांचा पगार द्यावा

कोल्हापूर : सर्वसामान्य गरीब विद्यार्थी शिकण्यासाठी महानगरपालिका शाळांचे अस्तित्व टिकले पाहिजे. या शाळा टिकविण्यासाठी माझ्या आमदार व मंत्रिपदाचे एक महिन्याचे मानधन मी शिक्षण मंडळास देत आहे. शिक्षकांनीसुद्धा आपला किमान पाच दिवसांचा पगार द्यावा, असे आवाहन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.
ते व्ही. टी. पाटील सभागृहात आज, रविवारी महानगरपालिका तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षकांना आर्दश शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमहापौर मोहन गोंजारे होते. मंत्री पाटील म्हणाले, शिक्षक हा समाजाच्या दृष्टीने जबाबदार घटक असतो. ते भावी पिढीचे मार्गदर्शक असतात. त्यामुळे शिक्षकांचा योग्य सन्मान करणे ही बाब कौतुकास्पद आहे. महानगरपालिका शिक्षकांना शासनाकडून १०० टक्के वेतन अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
यावेळी प्राथमिक शिक्षक मंडळ महानगरपालिकेच्या सभापती कै. आशा महेश बराले यांच्या स्मरणार्थ सर्व शिक्षक मंडळ सदस्य व कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्यावतीने पाच नंबर मनपा शाळेला ५० हजार रुपयांची खेळणी देण्यात आली.
कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती रोहिणी काटे, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, राष्ट्रीय काँग्रेस आघाडी गटनेते शारंगधर देशमुख, शिक्षण मंडळ सदस्य जयश्री साबळे, जहाँगीर पंडत, प्रा. डॉ. आर. शानेदिवाण, प्रा. समीर घोरपडे, भरत रसाळे, मधुकर रामाणे, उदय जाधव, लीला धुमाळ, तसेच राजू साबळे, महेश बराले यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण सभापती महेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रशासनाधिकारी बी. एम. किल्लेदार यांनी आभार मानले. सत्कार सोहळ्याप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते.

यांना मिळाला पुरस्कार
आदर्श शिक्षक म्हणून मनपा शाळेच्या शुभश्री संदीप वर्णे (म्युनि. रा. छ. संभाजी विद्या., साळोखेनगर), अजितकुमार भीमराव पाटील (म्युनि. प्रि. शिवाजी विद्यामंदिर, कसबा बावडा), वैशाली अजितकुमार पाटील (म्युनि. यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर), जोतिबा परसू बामणे (म्युनि. भाऊसो महागावकर विद्यामंदिर), रुकसाना उस्मान पटेल (म्युनि. उर्दू मराठी स्कूल), अनुदानित खासगी शाळेतील शिक्षक संजय महादेव पाटील (डॉ. श्रीधर सावंत विद्यालय), लालासाहेब महादेव पाटील (शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालय), सर्जेराव निवृत्ती भोसले (वाय. पी. पोवार विद्यालय), रचना अमरसिंह नलवडे (वाय. पी. पोवार विद्यालय), नंदिनी सुरेश अमणगीकर(सरस्वती चुनेकर विद्यालय), शैलेंद्र हुवा कांबळे (सुजन आनंद विद्यालय).

Web Title: Teachers should pay a five-day salary to the Municipal school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.