शिक्षकांनी भ्रष्टाचार ठेचून काढणारी पिढी निर्माण करावी
By Admin | Updated: May 13, 2015 00:47 IST2015-05-13T00:22:08+5:302015-05-13T00:47:41+5:30
नाना पाटेकर : कालकुंद्री जिल्हा परिषद शाळेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव

शिक्षकांनी भ्रष्टाचार ठेचून काढणारी पिढी निर्माण करावी
चंदगड : राजकारण आणि इतर क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अशा माणसांचा मला संताप येतो. भ्रष्टाचाऱ्यांना ठेचून मारणारी पिढी निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य संस्काराची शिदोरी द्यावी, असे आवाहन सुप्रिसद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जि. प. प्राथमिक शाळेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुण्याचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागीय उपायुक्त इंद्रजित देशमुख उपस्थित होते.
अनंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. संजय बाळराम पाटील यांनी स्वागत केले. पाटेकर म्हणाले, स्वत:च्या अनेक विवंचना असतात. त्याबाहेर जाऊन सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे. दीडशे वर्षांपूर्वी इथल्या शिक्षणप्रेमींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शाळा काढली आणि आजची उच्च शिक्षित पिढी त्यांच्या आशीर्वादाने निर्माण झाली. कालकुंद्री गावाने अनेक विद्याविभूषित रत्ने घडवली. या रत्नांचा हार गावाचा व परिसराचा विकास करण्यासाठी झटतो आहे. ही बाब अभिनंदनीय आहे. माझ्यावरही कोणतेही काम सोपवा, ते मी आनंदाने करीन.
तरुणांना संदेश देताना नाना म्हणाले, खायला-प्यायला आपल्याला सगळे ताजे पाहिजे; पैसा मात्र शिळा चालतो. बापजाद्यांच्या शिळ्या कमाईवर विसंबून न राहता स्वत:ची कष्टाची भाकरी शोधा.
यावेळी इंद्रजित भोसले म्हणाले, आयुष्यभर पुण्याईची उधळण करणाऱ्यांची जयंती साजरी होते. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आजच्या स्मृतिदिनी योगायोगाने शाळेला दीडशे वर्षे पूर्ण झाली हासुद्धा योगायोगच असल्याचे सांगितले. लाखो रुपये खर्च करून मनाच्या वेदना संपविता येत नाहीत. यावेळी गटशिक्षणाधिकारी एस. डी. डवरी, सुनील कुलकर्णी, संजय भोसले, एम. जे. पाटील, सुजाता पाटील, चंद्रकांत पाटील, एन. बी. हालबागोळ, वाय. आर. निट्टूरकर, आदी उपस्थित होते.