शिक्षकांना शोधावी लागणार शौचालये

By Admin | Updated: July 3, 2015 00:51 IST2015-07-03T00:51:08+5:302015-07-03T00:51:08+5:30

शासनाचा आदेश: शाळाबाह्य मुलांसोबत शौचालयांचा सर्व्हे; स्वच्छ महाराष्ट्र अभियान

Teachers need to find toilets | शिक्षकांना शोधावी लागणार शौचालये

शिक्षकांना शोधावी लागणार शौचालये

प्रदीप शिंदे - कोल्हापूर -शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार ४ जुलै रोजी एकाच दिवशी केल्या जाणाऱ्या शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणासोबत आता किती कुटुंबांकडे शौचालय आहे किंवा नाही, याचाही शोध घेण्याचा आदेश दिला आहे. ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ला मदत व्हावी म्हणून शौचालयांची माहितीही शिक्षकांमार्फत संकलित करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक शनिवारी शहरातील शौचालयांची माहिती घेण्यासाठी बाहेर पडणार आहेत.
शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे धोरण आहे. ४ जुलै रोजी ही सर्वेक्षण मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या विभागातील शाळाबाह्ण बालकांची नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणासोबत ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ (नागरी) अंतर्गत शौचालय उपलब्धतेचे सर्वेक्षण करण्याचा शासन अध्यादेश आला आहे. शाळाबाह्य बालकांची नोंदणी व शौचालयांची माहिती घेण्याचे काम प्रगणक म्हणून त्या-त्या भागातील शाळांमधील शिक्षकांवर सोपविण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांना आता शाळाबाह्ण मुलांच्या सर्वेक्षणासोबत महानगरपालिका व नगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये घरोघरी जाऊन शौचालयांचेही सर्वेक्षण करणे बंधनकारक राहणार आहे.

शाळाबाह्य
मुलांचा शोध
शाळेत न जाणारी बालके, ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही अशी सहा ते चौदा वयोगटातील बालके आणि विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना वयाच्या १८ वर्षापर्यंत शाळाबाह्य समजले जाते. या शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांचा शिक्षणाचा हक्क प्रदान करण्याचा शासनाचा मानस आहे.


शौचालयांची उपलब्धता
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ (नागरी)च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ (नागरी) राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शहरे हागणदारीमुक्त करणे हा एक उद्देश आहे. शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी शहरांमधील जी कुटुंबे उघड्यावर शौचालयास जात आहेत, अशी कुटुंबे शोधून त्यांना या अभियानांतर्गत शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

शाळाबाह्य मुले शोधण्याचे काम एप्रिल व मे महिन्यात प्रत्येक शाळेने हे पूर्ण केले आहे. पुन्हा आदेशामुळे काम करावे लागणार आहे. घरात शौचालय आहे की नाही, याची माहिती संकलित करावी लागणार. शिक्षकांना शालाबाह्य काम देणार नाही असे म्हणत शासन शाळाबाह्य विद्यार्थी, शौचालयांची माहिती घेण्याचे कामे लावत आहेत
- राजेंद्र कोरे, विभागीय अध्यक्ष, खासगी प्राथ. संघ

शाळाबाह्य बालकांचे सर्व्हेक्षण ४ जुलै रोजी करण्यात येणार आहे. शाळाबाह्य बालकांच्या सर्व्हेक्षणासोबत शिक्षकांना ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियाना’ला मदत व्हावी म्हणून शौचालयांचीही माहिती संकलित करणार आहे. एका शिक्षकाला एका दिवसात १०० घरांचे सर्व्हेक्षण करावे लागणार. शहरातील १३०० शिक्षकांची नियुक्ती केली आहे.- प्रतिभा सुर्वे, प्रशासनाधिकारी

Web Title: Teachers need to find toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.