शिक्षक संपावर जाणार, शाळा बंद

By Admin | Updated: August 25, 2015 23:53 IST2015-08-25T23:53:17+5:302015-08-25T23:53:17+5:30

२ सप्टेंबरच्या संपात सहभाग : लवेकर, आरडे यांची माहिती, कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन

Teachers go on strike, off school | शिक्षक संपावर जाणार, शाळा बंद

शिक्षक संपावर जाणार, शाळा बंद

कोल्हापूर : केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशातील प्रमुख ११ कर्मचारी संघटनांनी दिनांक २ सप्टेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यांच्याशी सहमती दर्शवून राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीनेही या संपात उतरणार असल्याचे जाहीर केले.
या दिवशी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा बंद राहतील, असे संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर व ज्येष्ठ शिक्षक नेते प्रभाकर आरडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या संपात कोल्हापूर जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच शिक्षक मिळून ७० हजार कर्मचारी व शिक्षक सामील होत आहेत.या संपाबाबत माहिती देताना अनिल लवेकर म्हणाले, महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या गेली पाच वर्षे प्रलंबित आहेत; तर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्याही गेली सात वर्षे प्रलंबित आहेत. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आल्यानंतर घेतलेल्या काही निर्णयांना मध्यवर्ती व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने विरोध केला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण रद्द करू नये, सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, आदी मागण्या केल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्रात सध्या सुरू असलेली कोणतीही शाळा बंद करू नये, शिक्षक व शिक्षकेतर सेवक भरतीवरील बंदी उठवावी, आदी जिल्हा पातळीवर शैक्षणिक व्यासपीठाच्या प्रलंबित मागण्या करण्यात आल्या.
या दिवशी सकाळी १० वाजता संग्राम उद्यान (टाउन हॉल) येथे सर्व कर्मचारी एकत्र येतील. तेथून दुपारी १२ वाजता निघणाऱ्या कोल्हापूर जिल्हा संयुक्त कामगार, कर्मचारी व शिक्षक संघटना कृती समितीच्या मोर्चामध्ये सामील होतील. हा मोर्चा टाउन हॉल, महापालिका, लुगडी ओळ, बिंदू चौक मार्गे मिरजकर तिकटी येथे आल्यानंतर बालगोपाल तालमीसमोर मोर्चा विसर्जित होणार आहे. या पत्रकार परिषदेस माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक, राम पाटील, बी. डी. पाटील, डॉ. शिवाजी हिलगे, एस. बी. लाड, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी होणार सहभागी
या मोर्चात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सामील होणार असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहतील, अशी माहिती खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, ज्येष्ठ शिक्षक नेते प्रभाकर आरडे यांनी यावेळी दिली.

Web Title: Teachers go on strike, off school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.