जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे उपोषण
By Admin | Updated: December 19, 2014 00:13 IST2014-12-18T23:49:43+5:302014-12-19T00:13:30+5:30
प्रशासनाकडून बेदखल : विविध मागण्यांकडे वेधले लक्ष, विविध संघटनेचे १४ पदाधिकारी सहभागी

जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे उपोषण
कोल्हापूर : जिल्हा परिषद शिक्षण प्रशासनाने १२ डिसेंबरला राबविलेले अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रद्द करावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या संघटनांच्या १४ पदाधिकाऱ्यांनी आज, गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केले. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाचा निषेध नोंदविला. आज प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सन २०१४-१५ च्या संचमान्यतेनुसार करावे, समायोजन तारखेच्या चार दिवस आधी अतिरिक्त शिक्षकांची प्राधान्यक्रमाने ज्येष्ठता यादी व रिक्त पदांचा अहवाल प्रसिद्ध करावा, पाचवी ते आठवीचे वर्ग सरसकट विनाअट शाळांना जोडावेत, पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांना विनाअट मुख्याध्यापक मिळावेत, प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नियमित मिळावे, दप्तर दिरंगाई थांबवावी, शिक्षक आणि शिक्षणाची गुणवत्तेच्या नावावर बदनामी थांबवावी, आदी मागण्यांसाठी उपोषणाला सुरू आहे. उपोषणात शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील, राजेश सोनपराते, चंद्रकांत पाटील, रवळू पाटील, प्रमोद तौंदकर, शिवाजी आळवेकर, राजू परीट, जोतिराम पाटील, विशाल हारुगले, पुरोगामी संघटनेचे प्रसाद पाटील, भिवाजी काटकर, रवींद्र शेंडे, कास्ट्राईब संघटनेचे गौतम वर्धन, शिक्षक संघाचे सुनील पाटील, आदी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, सदस्य एकनाथ पाटील, शशिकला रोटे, बाबासाहेब माळी यांनी उपोषणस्थळी भेट दिली.
मोर्चाचा निर्णय
उपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्यास उद्या, शनिवारी टाऊन हॉलपासून जिल्हा परिषदेवर
मोर्चा काढण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला.