शिक्षक केंद्रात, विद्यार्थी वाऱ्यावर
By Admin | Updated: November 27, 2014 00:19 IST2014-11-26T23:40:34+5:302014-11-27T00:19:11+5:30
पडसाळी प्राथमिक शाळा : एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान

शिक्षक केंद्रात, विद्यार्थी वाऱ्यावर
राम करले- बाजारभोगाव -शासनाकडून जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. दुसरीकडे मात्र मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा विरोधाभास पहावयास मिळतो. पन्हाळा तालुक्यातील पडसाळी प्राथमिक शाळेत गेल्या दोन वर्षांपासून एक शिक्षकी शाळा सुरू आहे. शैक्षणिक कामासाठी शिक्षक केंद्रात तर विद्यार्थी वाऱ्यावर अशी दयनीय अवस्था झाली आहे.
पन्हाळा पश्चिम भागाच्या टोकाला घाटमाथ्यावर पडसाळी गाव आहे. येथे जिल्हा परिषदेची पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. वीस विद्यार्थी आहेत. दोन वर्षांपूर्वी येथे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची बदली झाली आणि रिक्त जागा त्वरित भरण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी एका शिक्षकाची नेमणूक केली. मात्र तो हजर झालेला नाही.
येथील पाच वर्गांना शिकविण्याची तसेच मुख्याध्यापकाची जबाबदारी एकाच शिक्षकांवर आहे. पडसाळीपासून बारा किलोमीटर अंतरावर केंद्रशाळा काळजवडे असून अशैक्षणिक कामे देण्यासाठी वारंवार केंद्रात यावे लागते. मात्र विद्यार्थी लहान असल्याने किरकोळ भांडणे होण्याचे प्रसंग घडतात. त्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थ्यांची देखरेख ठेवण्यासाठी ‘कंत्राटी तत्त्वावर’ एखाद्या व्यक्तीला बसविले जाते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन दुसरा शिक्षक त्वरित द्यावा, अशी मागणी सरपंच पाटील यांनी केली आहे.
पडसाळी शाळेत १९ आॅगस्टला दुसरा शिक्षक देण्यात आला होता. मात्र, न्यायालयीन स्थगितीमुळे संबंधित शिक्षक हजर झाला नाही. तसेच प्रशासकीय कामे केंद्रात शाळेच्या वेळेत आणून देणे, असे संबंधित शिक्षकांना सांगणे चुकीचे आहे.
- एस. एम. मानकर,
प्रभारी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पन्हाळा
जिल्हा परिषदेने दुसरा शिक्षक त्वरित द्यावा, अन्यथा शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे, याची दखल प्रशासनाने घ्यावी.
- विलास कांबळे, ग्रामस्थ, पडसाळी
अशैक्षणिक कामे देण्यासाठी केंद्रात वारंवार जावे लागते. कामे केंद्रात घेऊन येण्यास केंद्रप्रमुख सांगतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकट्याला पुरेसा वेळ मिळत नाही.
- रमेश मेढेवार
प्रभारी मुख्याध्यापक, वि. मं. पडसाळी