शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बाचाबाची
By Admin | Updated: August 18, 2015 22:10 IST2015-08-18T22:10:28+5:302015-08-18T22:10:28+5:30
हातकणंगलेतील घटना : प्रोसिडिंग हिसकावून घेण्याचा प्रयत्न

शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बाचाबाची
हातकणंगले : हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नोत्तरानंतर विरोधक व समर्थक समोरासमोर भिडल्याने बाचाबाची होऊन वातावरण तणावाचे बनले. यावेळी सचिवांच्या हातातून प्रोसिडिंग हिसकावून घेण्याचाही प्रयत्न विरोधकांकडून झाला. केवळ अर्ध्या तासात सभा गुंडाळली गेली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष विजय भंडारी होते.हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची ३९वी वार्षिक सभा संस्थेच्या सभागृहामध्ये रविवारी पार पडली. अहवाल वाचन सचिव सुनील बुल्ले यांनी केले. यावेळी स्पिकरमधून आवाज व्यवस्थित येत नसल्याने गोंधळ सुरू झाला. विविध खर्चांबाबात व नफ्याबाबत आक्षेप घेत विरोधक अर्जुन पाटील व मारुती पाटील यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी भंडारी यांनी अहवाल सालात जो खर्च व नफा झाला आहे तो योग्य व बरोबर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधकांनी पुन्हा प्रश्न विचारायला सरुवात केली. तेच प्रश्न कशाला विचारता म्हणत समर्थक एम. वाय. पाटील, पोपट पाटील, आप्पासो गिड्डे, दिलीप पाटील, शशिकांत पाटील, आदिक पाटील यांनी विरोध केला. यामुळे विरोधक व समर्थक यांच्यामध्ये गोंधळाला सुरुवात झाली.
दरम्यान, विरोधकांनी सचीव बुल्ले यांच्या हातातील प्रोसिडिंग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. अशा गोंधळातच उपाध्यक्ष अनुजा वाघमारे यांनी आभार मानले व सभा संपल्याचे जाहीर केले.
सभेस अशोक वसगडे, रावसो मोहिते, इंद्रजित कदम, रावसो तांदळे, विजय कुमार प्रज्ञावंत, कामाण्णा धनगर, पुंडलिक परीट, आनंदराव पाटील, रंगराव पाटील, लता पाटील यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
म्हणून काय झाले
मोठ्या बँकेत दंगा होतोय त्यामुळे छोट्या संस्थेत झाला म्हणून काय झाले, अशी प्रतिक्रिया विजय भंडारी यांनी सभेबाबत विचारणा केली असता अशी प्रतिक्रिया दिली.