शिक्षिकेचे ११ तोळे दागिने लंपास
By Admin | Updated: June 13, 2014 01:59 IST2014-06-13T01:35:35+5:302014-06-13T01:59:38+5:30
सांगलीतील घटना : पोलीस असल्याची बतावणी; तिघांचे पलायन

शिक्षिकेचे ११ तोळे दागिने लंपास
सांगली : पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी ‘दागिने घालून फिरू नका, नाही तर दोन हजार रुपये दंड होईल’, अशी थाप मारून शिक्षिकेचे ११ तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. संध्या दिनेश भाटे (वय ५४, रा. सोनल अपार्टमेंट, विश्रामबाग) असे शिक्षिकेचे नाव असून, विश्रामबाग रस्त्यावरील राधास्वामी सत्संग ब्यासजवळील बोळात आज, गुरुवारी सायंकाळी साडेपाचला ही घटना घडली. दागिन्यांची किंमत तीन लाख रुपये आहे.
संध्या भाटे येथील मार्टिन इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. वटपौर्णिमा असल्याने सायंकाळी पाचला त्या मोपेडवरून राधास्वामी सत्संग ब्यासजवळील बोळात असलेल्या वडाच्या झाडाच्या पूजनासाठी गेल्या होत्या. पूजा झाल्यानंतर त्या मोपेडवरून सत्संग ब्यासजवळ आल्या. त्यावेळी दुचाकीवरून तिघे तरुण आले. त्यातील एकजण ३० ते ३५, तर अन्य दोघे २० ते २२ वयोगटातील होते. एकाने भाटे यांना ‘आम्ही पोलीस आहोत’, असे सांगून ओळखपत्रही दाखविले. त्यानंतर त्यांनी ‘तुम्ही दागिने घालून का फिरत आहात, दागिने घातले तर दोन हजार रुपये दंड आहे. कालच गुप्ता नामक एका महिलेवर चाकूहल्ला करून त्यांचे दागिने लंपास केले आहे. तुम्ही तुमचे दागिने काढून पर्समध्ये ठेवा’, असे त्यांना सांगितले.
संशयितांपैकी एकाने भाटे यांच्यासमोर दागिने काढण्याचे नाटक केले. यामुळे भाटेंनीही गळ्यातील मोहनमाळ, मंगळसूत्र, गंठण काढले. हातातील पाटल्या त्यांना निघत नव्हत्या. त्यावेळी संशयितांनी स्वत: त्या काढल्या. सर्व दागिने त्यांनी भाटे यांना पर्समध्ये ठेवून देतो, असे सांगितले. मात्र हातचलाखी करून त्यांनी हे दागिने काढून घेतले. मोकळी पर्स भाटे यांना देऊन ती पिशवीत ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी मार्केट यार्डच्या दिशेने पलायन केले. घरी गेल्यानंतर भाटेंना पर्समध्ये दागिने नसल्याचे दिसले. त्या तातडीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात आल्या. (प्रतिनिधी)