शिक्षक बँकेसाठी चंदगड तालुक्यात तिरंगी लढत
By Admin | Updated: March 30, 2015 00:24 IST2015-03-29T22:06:53+5:302015-03-30T00:24:25+5:30
गुरुजी प्रचारात सक्रिय : ऐन परीक्षेच्या काळात निवडणुकीची रणधुमाळी

शिक्षक बँकेसाठी चंदगड तालुक्यात तिरंगी लढत
चंदगड : कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यातून शिक्षक समिती, पुरोगामी संघटना व समता समिती पुरस्कृत राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलमधून शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष शंकर मनवाडकर (किणी), राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघ पॅनेलकडून शिवाजी शंकर पाटील (म्हाळेवाडी) व संभाजीराव थोरात संघ, तर कास्ट्राईब संघटनेतर्फे अनिल जयराम पाटील (कडलगे) हे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.चंदगड तालुक्यातून एकूण ४८७ सभासद आहेत. यावेळी तिन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे; पण विजय तितकासा सोपा नाही. दहा लाखांची कर्जमर्यादा करण्याचे दिलेले आश्वासनही सत्ताधाऱ्यांना पाळता आलेले नाही. पाच वर्षांत सभासद लाभांशाला मुकले, कोअर बँकिंग आणि बँक सुशोभीकरणासाठी विनाकारण खर्च केल्याचा आरोप विरोधक करत असून, डबघाईला गेलेली आणि कर्जात बुडालेली बँक आम्ही वाचविली असल्याचा दावा सत्ताधारी करीत आहेत. यावेळी पॅनेल रचनेत अनेक घडामोडी घडल्यामुळे पाठीमागची स्थिती आता राहिली नाही.यावेळी संघात उभी फूट पडली आहे. संघाचे पारगड पतसंस्थेचे दहा वर्षे अध्यक्षपद भूषविलेले अनिल पाटील यांनी बंड करत थोरात गटातून उमेदवारी मिळविलेली आहे. चंदगड तालुका हा शिक्षक समितीचा बालेकिल्ला आहे; पण आजपर्यंत तरी येथून समितीचा उमेदवार जिल्हा बँकेवर निवडून गेलेला नाही; पण यावेळेस ही संधी दिसते.शिक्षक समिती समता व नव्याने स्थापन झालेली, बऱ्यापैकी सभासद संख्या असलेली पुरोगामी शिक्षक संघटना एकत्र आल्याने यावेळेला शंकर मनवाडकर विजयापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर शिक्षक संघात फूट पडून अनिल पाटील यांनी संघाचे उमेदवार शिवाजी पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.तालुक्यातून आजपर्यंत नरसिंग धबाले, कै. सिद्धोजी होनगेकर, दयानंद पाटील, रमेश हुद्दार, वसंत जोशिलकर यांनी शिक्षक बँकेसाठी तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे. नरसिंग धबाले, सुरेश पाटील हे एकवेळ, तर शंकर मनवाडकर दोनवेळा पराभूत झाले असून, ते तिसरी वेळ आपले नशीब अजमावत आहेत. गुरुजींच्या बँकेतील चुरस ही सगळ्यापेक्षा वेगळीच आहे. (प्रतिनिधी)
शाळेच्या परीक्षा एप्रिलमध्येच असतात. त्याचवेळी शिक्षक बँकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात व गुरुजी प्रचारात, असे चित्र आहे. यामागील शिक्षक बँकेच्या निवडणुका दीपावली व मे महिन्याच्या सुटीत झालेल्या होत्या. सहकार खात्याने निवडणुकीची तारीख ऐन परीक्षेच्या कालावधीत जाहीर केल्याने पालक वर्गात नाराजी आहे. यापुढील काळात तरी परीक्षा हंगाम सोडून या निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.