शिक्षकाला १५ लाखांचा गंडा
By Admin | Updated: August 5, 2014 23:21 IST2014-08-05T22:42:22+5:302014-08-05T23:21:55+5:30
तिघांविरुद्ध गुन्हा : पैसे मागितल्याने अपहरण

शिक्षकाला १५ लाखांचा गंडा
सांगली : जिल्हा परिषदेच्या कुपवाड शाळेतील शिक्षक नंदू दादू सोनटक्के (रा. वसिष्ठ आर्केड, गव्हर्न्मेंट कॉलनी, सांगली) यांना साईआई परिवार संस्थेचे मार्गदर्शक होण्याचे व संस्थेला अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून १५ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोनटक्के यांनी पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्यानंतर त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचे अपहरण करण्यात आले. २३ जून २०१४ रोजी हा प्रकार घडला होता. मात्र भीतीने ते कुटुंबासह पुण्यात वास्तव्याला गेले. त्यांनी काल (सोमवार) रात्री विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य सूत्रधार स्वप्नजित वसंतराव पाटील (रा. विद्यानगर, कुपवाड), अतुल काळे (आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) व पांडुरंग रामचंद्र जगताप (विद्यानगर, मिरज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. सोनटक्के हे गव्हर्न्मेंट कॉलनीत राहतात. २० डिसेंबर २०१३ रोजी ते केस कापण्यासाठी केशकर्तनालयात गेले होते. तेथे त्यांची संशयित स्वप्नजित पाटीलशी ओळख झाली. त्याची राजकीय ओळख असल्याने सोनटक्के यांनी त्याला, ‘माझा शेठजी मोहिते यांच्याशी प्लॉटचा व्यवहार झाला होता. सहा लाख ९० हजारांचा हा व्यवहार होता. सध्या मोहिते अठरा लाख रुपये मागत आहेत. तुम्ही हा प्लॉट ठरलेल्या किमतीत मिळवून द्या’, असे सांगितले. यावर स्वप्नजितने, आपली जिल्ह्यातील मंत्री-आमदारांशी ओळख आहे, त्यांच्याशी बोलून काम करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून कामासाठी ८० हजार रुपये घेतले.
त्यानंतर सोनटक्के यांनी, प्लॉटचे काय झाले, याविषयी विचारणा केल्यानंतर स्वप्नजित त्यांच्याशी बोलणे टाळू लागला. ८० हजार रुपये परत देण्यास त्याने टाळाटाळ केली. दरम्यानच्या काळात त्याने सोनटक्के यांची भेट घेऊन, ‘साईआई परिवार या संस्थेचे तुम्ही मार्गदर्शक व्हावे, या माध्यमातून आई मंदिर, अन्नछत्र निर्माण करून भक्तांची सोय करू. हे काम सामाजिक असून, यासाठी अनुदान प्राप्त करून देण्याचे आमिष दाखविले.’ सोनटक्के यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. संस्थेची कागदपत्रे तयार करणे, अनुदान प्राप्त करून घेणे, ही कामे करून घेण्यासाठी स्वप्नजितने त्यांच्याकडून १५ लाख रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही संस्था अस्तित्वात आणली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनटक्के यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. (प्रतिनिधी)
शाळेत नेऊन अपहरण
स्वप्नजितने पैसे देण्यास नकार देऊन सोनटक्के यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनाही धमकावण्यास सुरुवात केली. २३ जूनला दुपारी एक वाजता स्वप्नजित हा अतुल काळे व अन्य साथीदारांना घेऊन सोनटक्के यांच्या घरी गेला. तेथे जातीवाचक शिवीगाळ करून सोनटक्के यांना मोटारीतून (क्र. एमएच १२- ००२३) आरग (ता. मिरज) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नेले. मुख्याध्यापक व संशयित पांडुरंग जगताप यांच्या कार्यालयात मारहाण केली.