शिक्षक बॅँकेच्या चौकशीचे आदेश

By Admin | Updated: February 24, 2015 00:57 IST2015-02-24T00:49:56+5:302015-02-24T00:57:04+5:30

सुनील शिरापूरकर : नारायण परजणे करणार संचालकांवर जबाबदारी निश्चितीची कारवाई

Teacher bank inquiry order | शिक्षक बॅँकेच्या चौकशीचे आदेश

शिक्षक बॅँकेच्या चौकशीचे आदेश

कोल्हापूर : दि प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेची कलम ‘८८’ नुसार चौकशीचे आदेश सोमवारी जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी दिले. राधानगरीचे सहायक निबंधक नारायण परजणे यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. ते संचालकांवर जबाबदारी निश्चितीची पुढील कारवाई करणार आहेत. बँकेच्या संचालक मंडळावरील कारवाई थांबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते, पण विरोधकांनी हा विषय ताणून धरल्याने अखेर कारवाईची प्रक्रिया सुरू करावी लागली.
बॅँकेच्या संचालकांनी मनमानी कारभार करत सव्वातीन कोटींची उधळपट्टी केल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने विरोधी गटाने संचालक मंडळ बरखास्तीची मागणी केली होती, पण जिल्हा उपनिबंधकांनी कारवाई करण्यास दिरंगाई केल्याने थेट सहकारमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील यंत्रणा हलली. ‘८८’ नुसार चौकशी करून त्यानुसार संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी राधानगरीचे सहायक निबंधक नारायण परजणे यांची नेमणूक केली आहे, पण त्यांच्या नेमणुकीचे आदेश देण्यातही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून दिरंगाई केली जात होती. अखेर सोमवारी परजणे यांना पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले. चौकशी अधिकारी रंजन लाखे व प्रदीप मालगावे यांच्या चौकशी अहवालातील मुद्यानिहाय फेरचौकशी करून संबंधितांचे म्हणणे घेतले जाणार आहे. तरलता राखण्याकडे बॅँक संचालकांनी दुर्लक्ष केल्याने २ लाख ४ हजाराचा दंड, कोअर बॅँकिंगप्रणाली निविदाविनाच, लाभांश वाटप, रिझर्व्ह बॅँकेची परवानगी न घेताच ए. टी. एम. सुरू, एकरकमी परतफेड योजनेत १७ लाखांचे नुकसान, निबंधकांची परवानगी न घेताच बॅँकेचा लूक बदलण्यावर लाखो रुपये खर्च, हे चौकशी अहवालातील प्रमुख मुद्दे आहेत. या मुद्द्यानुसार नारायण परजणे पुढील चौकशी व कारवाई करणार आहेत. संचालकांच्या चुकीच्या कारभारामुळे बॅँकेचे किती नुकसान झाले, ते निश्चित करून त्यानुसार संचालकांवर जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे समजते.

Web Title: Teacher bank inquiry order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.