शिक्षक बँकेवर पुन्हा समितीराज..!
By Admin | Updated: April 27, 2015 00:16 IST2015-04-26T23:40:18+5:302015-04-27T00:16:06+5:30
१३ जागांवर विजय : थोरात गटाला ८ जागा; शि. द. पाटील गट, परिवर्तन पॅनेलचा धुव्वा

शिक्षक बँकेवर पुन्हा समितीराज..!
सांगली : अत्यंत चुरशीने झालेल्या सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विश्वनाथ मिरजकर यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक समितीने वर्चस्व राखले. २१ पैकी १३ जागांवर विजय संपादन करीत समितीने संभाजीराव थोरात गटाचा पराभव केला. या निवडणुकीत थोरात गटाला ८ जागांवर समाधान मानावे लागले, तर शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील, परिवर्तन पॅनेलचा धुव्वा उडाला. बँकेचे माजी अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब अनुसे, समितीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांना पराभवाचा धक्का बसला.
शिक्षक बँकेच्या २१ जागांसाठी चौरंगी लढत झाली. या निवडणुकीसाठी शनिवारी ९७ टक्के मतदान झाले होते. रविवारी सकाळी येथील तरुण भारत क्रीडांगणाच्या हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. बारा वाजेपर्यंत मतांचे गठ्ठे बांधण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात झाली. दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी वाळवा सर्वसाधारण गटातील पहिला निकाल जाहीर करण्यात आला. या गटातून शिक्षक समितीचे रमेश पाटील व थोरात गटाचे सुधाकर पाटील विजयी झाले. त्यांना अनुक्रमे २०९८ व २१०८ मते मिळाली. या गटातून समितीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील यांचा पराभव झाला. त्यांना १९०५ मते मिळाली, तर थोरात गटाचे संजय काटे यांना २०२५ मते मिळाली. या दोन्ही पराभूतांना क्रॉस व्होटिंगचा फटका बसला.
मिरज सर्वसाधारण गटात समितीने दोन जागा राखल्या, तर एका जागेवर थोरात गटाला यश आले. या गटातून समितीचे श्रेणिक चौगुले (१९७५ मते), तुकाराम गायकवाड (२०३४), तर थोरात गटाचे शामगोंडा कुमगोंडा पाटील (२१२९) विजयी झाले. त्यांनी समितीचे महादेव पाटील (१८७७), थोरात गटाचे असिफ शेख (१९३१) व शिवानंद तेलसंग (१९०६) यांचा पराभव केला. तासगाव सर्वसाधारणमध्ये थोरात गटाचे अविनाश गुरव (२१५५) व समितीचे शिवाजी पवार (२१०२) विजयी झाले. त्यांनी समितीचे शब्बीर तांबोळी (१९३५) व थोरात गटाचे रघुनाथ थोरात (१७९०) यांचा पराभव केला. तीन तालुक्यातील निकालापर्यंत समितीचे चार व थोरात गटाचे तीन संचालक निवडून आले होते. या वेळेपर्यंतचा कल पाहता, कुणाची सत्ता येणार, याची उत्सुकता ताणली गेली होती.
खानापूर सर्वसाधारणमध्ये थोरात गटाला मोठा धक्का बसला. बँकेचे माजी अध्यक्ष सतीश पाटील यांचा ६४ मतांनी पराभव झाला. पाटील यांना १९६१ मते मिळाली. या गटात समितीचे बाळासाहेब आडके (२०२५) व थोरात गटाचे सुनील गुरव (२१०८) विजयी झाले.
आटपाडी सर्वसाधारणमधून समितीचे उत्तम जाधव (२२५७) यांनी थोरात गटाच्या अशोक मोटे (२०५५) यांचा पराभव करीत आघाडी घेतली. जत सर्वसाधारणमध्ये थोरात व समितीला प्रत्येकी एक जागा मिळाली. समितीचे राजाराम सावंत (२०२१) व थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे (२१७१) विजयी झाले. कडेगाव सर्वसाधारणमध्ये समितीचे महादेव माळी (२१९६) यांनी थोरात गटाचे धनंजय नरुले (२०९२) यांचा पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये समितीचे शशिकांत बजबळे (२०५७) यांनी थोरात गटाचे विलास हाक्के (१९९०) यांचा ६७ मतांनी पराभव केला. पलूसमध्ये थोरात गटाने बाजी मारली. या गटाचे बाजीराव पाटील (२०१८) यांनी समितीचे धोंडीराम पिसे (१९५३) यांचा पराभव केला. शिराळ्यामध्ये समितीचे सदाशिव पाटील (२०८१) यांनी थोरात गटाचे प्रकाश जाधव यांचा (२०४०) अवघ्या ४१ मतांनी पराभव केला.
सर्वसाधारण गटात समितीला १०, तर थोरात गटाला ६ जागा मिळाल्या. त्यामुळे राखीव गटातील ५ जागांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. राखीव गटातही समितीने तीन जागांवर बाजी मारली. इतर मागास प्रवर्गातून समितीचे श्रीकांत माळी (२१३४) यांनी थोरात गटाचे फत्तू नदाफ (१९६०) यांचा पराभव केला. अनुसूचित जाती गटातून थोरात गटाचे महादेव हेगडे (२०७०) यांनी समितीचे देवानंद गोटखिंडे (१९७३) यांचा, तर विमुक्त जाती व भटक्या जमाती गटातून समितीचे हरिबा गावडे (२१३५) यांनी थोरात गटाचे विद्यमान संचालक बाळासाहेब अनुसे (१८९०) यांचा पराभव केला. महिला राखीव गटातील दोन जागांवर मोठी चुरस झाली. या गटातून समितीच्या अर्चना खटावकर (२१५१) व शोभा पाटील (१९९२) विजयी झाल्या. समितीच्या सुषमा देशमाने यांचा अवघ्या ३ मतांनी पराभव झाला.
या निवडणुकीत समिती व थोरात गटात ४० ते ७० मतांचा फरक राहिला. शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील तरुण मंडळाच्या उमेदवारांना १३०० ते १५०० मते मिळाली, तर परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना २०० ते ३०० मते मिळाली. (वार्ताहर)
कार्यकर्त्यांचा जल्लोष
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत चारही गटांनी चुरशीने प्रचार केला. एका-एका सभासदापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रणा राबविली. शनिवारी मतदानही चुरशीने झाले. रविवारी सकाळी येथील तरुण भारत क्रीडांगणाच्या हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासूनच चारही पॅनेलचे कार्यकर्ते गटा-गटाने दाखल होत होते. दुपारनंतर निकाल जसजसे हाती येऊ लागले, तसतसे थोरात व शि. द. पाटील गटाचे कार्यकर्ते गायब झाले आणि समितीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. सायंकाळपर्यंत निव्वळ जल्लोष सुरू होता.
महिला राखीवमध्ये फेरमतमोजणी
महिला गटात समितीच्या सुषमा देशमाने यांनी थोरात गटाच्या शोभा पाटील यांचा ७ मतांनी पराभव केला होता. या निकालावर थोरात गटाने फेरमतमोजणीची मागणी केली. फेरमतमोजणीनंतर शोभा पाटील या एका मताने आघाडीवर गेल्या. त्याला पुन्हा समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. तीन टेबलांवर देशमाने यांच्या मतांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला. जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. एस. एन. जाधव यांनी या तीन टेबलांवरील मतांची फेरमोजणी केली. या फेरीत शोभा पाटील या देशमाने यांच्यापेक्षा तीन मते अधिक मिळवून विजयी झाल्या.
हे जिंकले, हे हरले...
या निवडणुकीत थोरात गटातून विद्यमान संचालक विनायक शिंदे व अविनाश गुरव विजयी झाले, तर संचालक सतीश पाटील, बाळासाहेब अनुसे यांना पराभवाचा धक्का बसला. समितीचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष अजित पाटील हे दिग्गज पराभूत झाले.