मुलांना अनुभवाधिष्ठित, कृतिशील शिक्षण द्या

By Admin | Updated: March 12, 2015 00:09 IST2015-03-11T22:18:56+5:302015-03-12T00:09:18+5:30

बालवाड्या म्हणजे प्रयोगशाळा असाव्यात : सुचेता पडळकर--थेट संवाद

Teach your children a well-educated, cultured education | मुलांना अनुभवाधिष्ठित, कृतिशील शिक्षण द्या

मुलांना अनुभवाधिष्ठित, कृतिशील शिक्षण द्या

मूल तीन वर्षांचे होत आले की घराघरांत त्याला कुठल्या शाळेत घालायचे यावर चर्चा झडतात. आपल्या पाल्याने स्पर्धेत अव्वलच आले पाहिजे, या आकांक्षेपोटी त्यांच्यावर बालवयातच अतिरिक्त ताण टाकला जातो. परिणामी मुले ज्ञानार्थी नाही, तर परीक्षार्थी बनतात. ही वाट सोडून हसत-खेळत ज्ञान या संकल्पनेतून आकाराला आली बुनियादी शिक्षण संस्था संचलित ‘फुलोरी’ ही बालवाडी.. या संस्थेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त संचालिका सुचेता पडळकर यांच्याशी साधलेला थेट संवाद...
प्रश्न : फुलोरा संस्थेच्या स्थापनेमागची भूमिका कोणती?
उत्तर : बालवाड्या म्हणजे प्रयोगशाळा असाव्यात, जिथे मुलांना ज्ञानाचा आनंद घेता यावा, रोज शाळेत येताना कुतूहल असावे, नवीन काही अनुभवण्याची महाराष्ट्र शासनाने १९९६ मध्ये स्वीकारलेला राम जोशी समितीचा अहवाल माझ्या वाचनात आला. त्या समितीत गोविंद पानसरे होते. त्यांच्या मार्गदर्शनानंतर ३ ते ६ या वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘फुलोरा’ची स्थापना झाली. ‘फुलोरा’ ही पालकांनीच सुरू केलेली आणि आजही पालकांच्याच सहभागातून चालणारी बालशाळा आहे. जिथे मुलांना अनुभवाधिष्ठित आणि कृतिशील शिक्षण दिले जाते.
प्रश्न : ‘फुलोरा’मध्ये कशा पद्धतीने शिक्षण दिले जाते?
उत्तर : ठरवून दिलेल्या मूल्यांनुसार फुलोराचे काम चालते. आपलं प्रत्येक काम सुंदर असावे, राहणी-व्यक्तिमत्त्व प्रसन्न असावे, भौतिक सुखांचा हव्यास न धरता निसर्गाचा संयमाने उपभोग घ्यावा, निसर्गाचा समृद्ध ठेवा सांभाळण्याकडे कल असावा, स्वत:ला क्रमश: विकसित करणारी, व्यक्तिगत क्षमता वाढवणारी अशी स्वत:ची स्वत:शीच स्पर्धा करायची. जीवघेणी व मत्सर पेटवणारी स्पर्धा करायची नाही. आपली भाषा आपल्याला नीट यायला हवी आणि सोबत शक्य तितक्या भाषा आत्मसात कराव्यात, सृजनशीलता हा स्थायीभाव असावा, अशी ती समाजाभिमुख असावी, श्रम करणाऱ्यांबद्दल आत्मियता असावी त्यासाठी स्वत: श्रम करून पाहावेत, या मूल्यांशी आम्ही कधीच तडजोड केली नाही.
प्रश्न : फुलोरा अन्य बालवाड्यांपेक्षा वेगळी कशी?
उत्तर : शाळेत आल्यापासून मुलांच्या हातात फक्त पाटी-पेन्सिल, पुस्तकं असे शिक्षण आम्ही कधीच देत नाही. इथे प्रत्येक कामात मुलांचा सहभाग घेतला जातो म्हणजे कधी लिंबाचे सरबत बनवायचे, शाळेतच भाज्या बनवून सगळ््यांनी मिळून जेवायचे. परिसर आणि निसर्गाची ओळख व्हावी यासाठी तर सारख्या सहली काढल्या जातात. मुलांना जे काही शिकवले जाते त्याचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता यावा हा त्यामागचा उद्देश असतो. मुलांच्या बुद्धिमत्तेला, त्यांच्या ज्ञानेंद्रियांना अधिक चालना देणारे खेळ घेतले जातात. त्यातून मग वाचन, लेखन घेतले जाते. त्यात शामली यादव, नंदिनी पाटील, सुप्रिया उरुणकर, सानिका तासे या तीन शिक्षिकांचे सहकार्य लाभते.
प्रश्न : ‘फुलोरा’तून बाहेर पडलेले विद्यार्थी कोणकोणत्या क्षेत्रात आहेत ?
उत्तर : आता ‘फुलोरा’तून बाहेर पडलेल्या मुलांना आम्हाला मान वर करून पाहावे लागते इतकी ती मोठी झाली आहेत. कोण इंजिनिअर, डॉक्टर, आर्किटेक्ट, मिलेटरीत कॅप्टन आहेत. कोणी स्क्रीप्ट रायटिंग करतंय, कोण आपल्या व्यवसायात लक्ष देतंय, नृत्यांगना, आहारतज्ज्ञ, सीए, खेळाडू, संशोधन करून अगदी परदेशातसुद्धा मुलं गेलीत, तर काहीजण छोट्या पडद्यावर देखील चमकताहेत. त्यांचे हे कर्तृत्व आणि करिअरच्या वेगवेगळ््या वाटा धुंडाळणं पाहिलं की ‘फुलोरा’चा उद्देश सफल झाल्याची प्रचिती येते.
प्रश्न : फुलोराचे काम बालवाडीपर्यंतच का मर्यादित ठेवले?
उत्तर : या वयात मुलांवर होणारे संस्कार त्यांची आयुष्यभर साथ देतात. त्यामुळे आम्ही हाच वयोगट निश्चित केला. याच मूल्यांनुसार लीलाताई पाटील यांची ‘सृजन आनंद’ ही शाळा काम करते. जिथे पहिलीपासूनच्या पुढच्या शिक्षणाची सोय आहे. खरंतर ते फुलोराचे मोठे भावंड आहे. त्यामुळे पुन्हा वेगळी शाळा काढावी, असे वाटत नाही.
प्रश्न : आगामी काळातील काही योजना ?
उत्तर : शिक्षणाच्या प्रवाहाच्या उगमापाशी आम्ही काम करतो. त्यामुळे फक्त बालवाडी एके बालवाडी असं न करता त्यात अधिक भर टाकत मुलांच्या मनोविकासावर आम्हाला भर द्यायचा आहे. शाळेबद्दल पालकांना माहिती कळली पाहिजे यासाठी काही दिवसांपूर्वीच ‘फुलोरा डॉट कॉम’ ही वेबसाईट काढण्यात आली आहे. अनेक शाळा, संस्था फुलोराला भेट देण्यासाठी येतात. त्यांच्याकडून नवनवीन संकल्पना कळतात. अशारितीने फुलोरा अधिक फुलवत न्यायचा आमचा प्रयत्न राहील.
- इंदुमती गणेश

Web Title: Teach your children a well-educated, cultured education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.