टीडीआरप्रश्नी टीकेची झोड उठणार
By Admin | Updated: July 19, 2015 23:53 IST2015-07-19T23:52:32+5:302015-07-19T23:53:00+5:30
आज महापालिका सभा : मार्केट, दुकानगाळे, स्मार्ट सिटी प्रकल्प यावर होणार चर्चा

टीडीआरप्रश्नी टीकेची झोड उठणार
कोल्हापूर : महापालिकेचे मार्केट दुकानगाळे हस्तांतरण करणे, मुदतवाढ व भाडे, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळा पब्लिक पर्सनल पार्टनरशिप (पीपीपी) या तत्त्वावर खासगी संस्थांना देणे, आदी विषयांवर आज, सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. टीडीआरप्रश्नी गुन्हा दाखल झाल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठणार असल्याने सभा वादळी होण्याची शक्यता आहे.
काही नगरसेवकांनी आजच्या सर्वसाधारण सभेत आरक्षण उठविण्याचा प्रस्ताव टाकल्याचे समजते. यावरून मोठे वादंग उठू शकते. तसेच केंद्र सरकारपुरस्कृत स्मार्ट सिटी प्रकल्पांंतर्गंत कोल्हापूर शहराचा समावेश व्हावा, प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळा पीपीपी तत्त्वावर संस्थांना देण्याचा ठराव मंजुरीसाठी देण्यात आला आहे. हा ठराव मंजूर झाल्यास संबंधित संस्थेला ती शाळा २० वर्षे कराराने देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या दोन किलोमीटर परिसरातील ४५ टक्के उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश देणे त्या संस्थेला बंधनकारक ठरणार आहे. या बदल्यात या संस्थांकडून मिळणारे पैसे हे प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन हे अन्य शाळांमधील भौतिक सुविधांवर खर्च करणार आहे. त्याचबरोबर साने गुरुजी वसाहतीतील क्रीडांगणासाठी आरक्षित जागेच्या टीडीआर प्रश्नावर प्रशासनाच्या विरोधात सभागृहात टीकेची झोड उठण्याची शक्यता आहे.
फरास यांचा गुरुवारी राजीनामा
कोल्हापूर : महापालिकेचे स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या राजीनाम्यावरून गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, ते गुरुवारी (दि. २३) सभापतिपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे उर्वरित कालावधीसाठी या पदासाठी राष्ट्रवादीत चढाओढ होणार आहे.
२०१० साली झालेल्या निवडणुकीत सत्तेत एकत्रित आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी महापौर-उपमहापौर, स्थायी, परिवहन, प्राथमिक शिक्षण, महिला व बालकल्याण समिती अशी पदांची वाटणी केली होती. ‘स्थायी’च्या दोन्ही वेळेमध्ये सहा-सहा महिन्यांसाठी हे पद देण्याचे ठरले आहे. त्यामुळे आतापर्यंत गटनेते राजेश लाटकर, रमेश पोवार व त्यानंतर आदिल फरास यांना स्थायी समिती सभापतिपदाची संधी मिळाली आहे. सध्या राष्ट्रवादीचे स्थायी सदस्य ज्योत्स्ना मेढे-पवार, प्रकाश गवंडी व सर्जेराव पाटील हे आहेत. त्यापैकी मेढे-पवार यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरल्याने त्यांची निवड निश्चित आहे. त्यामुळे प्रकाश गवंडी व सर्जेराव पाटील या दोघांमध्ये स्थायी सभापतिपदासाठी रस्सीखेच असणार आहे. गवंडी हे सतत पक्षाच्या कामात सक्रिय असतात. त्यामुळे गवंडी यांचे नाव सभापतिपदासाठी निश्चित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुरुवारी (दि. २३) फरास यांचा राजीनामा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे बैठक घेणार आहेत. त्या बैठकीमध्ये स्थायी सभापतिपदी कुणाची निवड होणार हे स्पष्ट होईल.