‘टिडीआर’ लाटला, हातही झाले ओले
By Admin | Updated: July 19, 2015 00:26 IST2015-07-19T00:25:44+5:302015-07-19T00:26:51+5:30
पोलिसांसमोर चौकशीचे आव्हान : अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले ; सत्य समोर येणार

‘टिडीआर’ लाटला, हातही झाले ओले
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनास बोगस कागदपत्रांच्या आधारे काही कोटींचा अतिरिक्त टीडीआर लाटून फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने याप्रकरणाशी संबंधित सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महानगरपालिकेतील तसेच भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपले हात ओले करून घेतल्याचा आरोप होऊनही तत्कालीन आयुक्तांनी केवळ लाटलेला टीडीआर रद्द केला; परंतु सध्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा पोलखोल करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने नेमके सत्य बाहेर येणार आहे.
अडीच वर्षांपूर्वी बोगस कागदपत्रांच्या आधारे टीडीआर लाटल्याचे प्रकरण बाहेर आले आणि महानगरपालिकेत दहा वर्षांपासून बेमालूमपणे सुरू असणारा घोटाळा बाहेर आला. तसेच टीडीआर म्हणजे काय? इथपासून सर्व माहिती पुढे आली.
धैर्यशील पाडुरंग यादव या बांधकाम व्यावसायिकाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून सानेगुरुजी वसाहतीजवळील रि.स.नं. १०१०/अ या जागेपैकी क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या ८० हजार चौरस फूट जागेचा टीडीआर घेण्याऐवजी दोन लाख चौरस फूट जागेचा टीडीआर घेतला होता. हे प्रकरण नगरसेवक भूपाल शेटे यांनी बाहेर काढले. त्यावेळी त्यांच्यावर दबाव यायला लागला; परंतु त्यांनी दबावास न जुमानता या प्रकरणात कशी फसवणूक झाली याचे कागदोपत्री पुरावे दिले. तरीही तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिलेला टीडीआर रद्द करण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नव्हती.
नगरसेवक शेटे यांनी सध्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांना हे प्रकरण समाजावून देण्याचा त्यासंबंधातील सर्व कागदपत्रे दाखविण्याचा प्रयत्न केला. शिवशंकर यांना या प्रकरणातील गांभीर्य लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणात सहभागी असलेली एक पूर्ण साखळी हादरून गेली आहे. बोगस टीडीआर घोटाळ्याचा छडा लावण्याची ही सुरुवात आहे. (प्रतिनिधी)
अनेक अधिकारी चौकशीच्या जाळ्यात
या प्रकरणात महानगरपालिकेतील अनेक अधिकाऱ्याचा संबंध आला आहे. विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यापासून ते नगर अभियंता, उपायुक्त आणि नगररचना विभागातील सर्व्हेअरपासून सहायक संचालक इथपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या हाताखालून धैर्यशील यादव प्रकरणाची फाईल गेली आहे. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील काही कर्मचारी, अधिकारीही या प्रकरणाशी संबंधित आहेत. जागेची मोजणी त्यांच्यामार्फ त झाली आहे म्हणूनच पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
प्रशासकीय कारवाईही व्हावी
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचा छडा लागेल, संबंधितांवर कारवाई होईल; परंतु प्राथमिक चौकशीत आढळून आलेल्या त्रुटींच्या आधारे आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रशासकीय चौकशी करून या घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली.
बाकीच्या प्रकरणांचे काय?
महानगरपालिकेत २००० सालापासून आजअखेर शहरातील विविध ठिकाणांच्या २०३ जागांच्या बदल्यात किमान ८६ लाख स्क्वेअर फुटाचे टीडीआर दिले असून, ही सर्व प्रकरणेही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. जागांचे टीडीआर दिल्यानंतर त्या जागा मनपाने ताब्यात घेण्यात उदासिनता दाखविली, अद्यापही काही जागा मूळ मालकांच्या ताब्यातच आहेत. पैकी एकही जागा विकसित केलेली नाही. काही अधिकाऱ्यांनी अधिकारात चुकीचे एस्टिमेट करून कमी पैसे भरून घेतल्याचा आरोप होतोय. धैर्यशील यादव टीडीआर प्रकरण बाहेर आल्यानंतर काही प्रकरणांच्या फाईली गहाळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याचाही शोध घेण्याची गरज आहे.